सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : आरोग्यम धनसंपदा म्हटले जाते व आजची वस्तूस्थिती पाहता ती सत्य परिस्थिती आहे. पालिकेच्या वाशीतील एफआरयू हॉस्पिटलमध्ये जी यंत्रणा आहे, त्याची कोणी पाहणी केली आहे का, मशिन किती चालु आहेत, कर्मचारी किती दबावाखाली काम करत आहे, सर्व पाहणी केल्यावर महापालिकेच्या आरोग्य सेवचा बोजवारा उडाला असल्याची टीका शिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी केली.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सभागृहात नगरसेवक रामदास पवळे सभागृहात बोलत होते.
तूर्भे हॉस्पिटल बंद झाले आहे, तेथील कर्मचारी कोठे आहेत, काय काम करत आहेत, कोणी माहिती देईल का, वाशीच्या एफआरयूमधील परिचारिका कमालीच्या तणावाखाली काम करत आहेत, प्रशासनाला रूग्नालयाच्या कामाबाबत पत्र पाठविले तरी प्रशासन त्या पत्रावर विचार करत नाही. मग प्रशासन करते तरी काय? एफआरयूमध्ये साधा केसपेपर काढायला तीन तीन तास रांगा लावाव्या लागत आहेत, महापालिकेचा कारभार सुधारण्याची मागणी नगरसेवक रामदास पवळे यांनी केली.
मोकाट कुत्र्यांचा नवी मुंबईत सुळसुळाट झाला असून अस्वच्छता वाढीस लागली आहे. कुत्र्यांच्या विष्ठा रस्तोरस्ती पडल्या आहेत. पाय जपून टाकावा लागतो नाहीतर चपला खराब होतात. मोकाट कुत्र्यांवर उपाययोजना केली पाहिजे. हा गंभीर विषय आहे. प्राणीमित्रांच्या भावनेचा आदर आहे. त्यांच्या भावनांशी आपण खेळत नाही. पण त्यांना स्वतंत्र १५-२० एकरचा प्लॉट द्यावा, त्या ठिकाणी शहरातील सर्व मोकाट कुत्री सोडावीत, कुत्री चावा घेतात, त्यांच्यामुळे रोगराई वाढीस लागत असल्याचे नगरसेवक रामदास पवळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
नाल्यावरील दुर्गंधी, एपीएमसीतील अस्वच्छता, एपीएमसीच्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाचे एपीएमसीवर नियत्रंण नसणे या सर्वच गोष्टींचा विस्तृत स्वरूपात नगरसेवक रामदास पवळे यांची उहापोह करत आरोग्य विभागाच्या कामकाजातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.