जळगाव : आपल्याला ज्याप्रकारे शिवरायांचा इतिहास सांगितला गेला, तो खोटा आहे. खरा इतिहास लपविण्याचा प्रयत्न पुरंदरे यांच्या लिखाणातून केला गेला आहे. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते. शिवाय शिवाजी महाराजांनी अन्याय करणार्यांमध्ये मुस्लिम, ब्राह्मण आणि मराठ्यालाही ठार केले. यामुळे शिवरायांचा लढा हा जाती, धर्मासाठी नव्हता, तर राजकीय होता. मात्र, हा खरा इतिहास आपल्यापासून लपविण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी येथे दिली.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, महाराष्ट्र चर्मकार महासंघ, अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन, मुस्लिम समन्वय समिती, जिजाऊ बिग्रेड व इतर सर्व पुरोगामी व समविचारी बहुजन संघटनांतर्फे आयोजित शिवसन्मान जागर परिषदेत आमदार डॉ. आव्हाड बोलत होते. जिल्हा बँकेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेस इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, खलिल देशमुख उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले.
आमदार डॉ. आव्हाड म्हणाले, की शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षांनंतरही उदो-उदो होतो, घराघरांत चर्चा केली जाते. कारण चर्चा ही क्रांतीचीच होते आणि ही क्रांती शिवरायांनी केली आहे. शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानाचा वध केला. इतकाच इतिहास आपल्याला शिकविला गेला आहे. परंतु, शिवरायांना वाघ नखे कोणी दिली, याचा उल्लेख कुठेही केलेला नाही. हा खरा इतिहास लपवून ठेवला आहे. हे केवळ पुरंदरेंच्या पुस्तकातून दाखविलेल्या इतिहासामुळे होत आहे. याच पुस्तकाच्या प्रत्येक पानावर जिजामातेच्या चारित्र्याचे हनन केले आहे. हे मुलांसमोर येऊ द्यायचे नाही म्हणून गावागावांमध्ये जाऊन खरा इतिहास सांगण्याचे काम आम्ही करत आहोत. शहाजीराजांचे अस्तित्व, शिवाजी महाराजांचे कर्तृत्व या पुस्तकातून गहाळ केले आहे. पुरंदरे यांच्या ‘छत्रपती शिवाजी राजे’ या पुस्तकाला विरोध एवढ्यासाठीच आहे, की भविष्यात कोणी संशोधनासाठी या पुस्तकाचा आधार घेईल आणि विकृत इतिहास समोर जाईल. हे थांबविण्यासाठी आणि ही विकृती फेकून द्या हे सांगण्यासाठीच आहे. अशा विकृतीकार पुरंदरेंना राज्य शासनाने महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन आमच्यासारख्यांना चिमटा घेतला आहे. अशा शासनाला त्यांची खुर्ची खाली करण्यास जनता आता भाग पाडेल.
*** पुरंदरेंची मानसिकता अतिरेकी – कोकाटे
साडेतीनशे वर्षांनंतरही जय शिवाजी, जय जिजाऊ म्हणत उदो-उदो केला जातो. त्या शिवरायांची जयंती महात्मा फुलेंनी सुरू केली. त्यांच्यामुळे शिवाजी महाराज घराघरांत पोहोचले. परंतु, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केल्याचा उल्लेख पुरंदरेंनी केला आहे. पुरंदरेंमुळे दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी घराघरांपर्यंत पोहोचले. याकरिता मात्र शिवचरित्र वापरले. पुरंदरेंची मानसिकता अतिरेकी, दहशतवादी स्वरूपाची आहे. त्यांना मुंबई एटीएसने अटक करावी.