*** साथीच्या आजाराचे मूळ भ्रष्टाचारात असल्याचा नगरसेवक पाटकरांचा गंभीर आरोप***
सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : महापालिकेच्या कारभारात चूक झाली की प्रशासनावर ढकलून द्यायचे आणि महापालिका कारभारामुळे पुरस्कार मिळाले की आमच्यामुळे मिळाले ही दुटप्पी भूमिका आहे. साथीचे आजार व इतर आजाराचे मूळ भ्रष्टाचारात आहे. ठेकेदारांकडून व औषध निर्मात्यांकडून ५ टक्के कोण घेतेय त्याचा शोध घेतला पाहिजे अशी घणाघाती टीका शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी महासभेदरम्यान केली.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) सभागृहात नगरसेवक किशोर पाटकर सभागृहात बोलत होते.
किमान आरोग्य विभागात तरी भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. जनतेची काळजी घ्यायला तळमळ लागते. जनतेचा तळतळाट कशाला घेता साथीच्या आजाराचा अभ्यास केल्यास ७० टक्के चूक ही नागरिकांची आहे. पाण्याच्या टाक्या उघड्या ठेवल्या जातात. त्यांना दंड लावा. कोणाला दोष देवून काही फायदा नाही. साधी ब्लिचिंगची पावडर टाकली तरी डेंग्यूच्या अळ्या मरतात. जोपर्यत साथीच्या आजाराविषयी जनजागृत होत नाही, तोपर्यत डेंग्यू, मलेरिया आटोक्यात येणार नसल्याचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी सांगितले.
महापालिका निवडणूकीच्या अगोदरच पैसे कोठे गेले आहेत. १३०० कोटीची कामे देण्यात आली. हॉस्पिटल उघडा म्हणून मागणी करतात, पण हॉस्पिटल बांधण्यासाठी पैसे आणणार कोठून? केवळ घोषणा करायच्या माहिती आहेत आणि पुरस्कार मिळाल्यावर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. आज सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच नगरसेवकांनीच विरोधी पक्षाच्या नगरसेवकाचे काम केले असल्याचे नगरसेवक पाटकर यांनी सांगितले.
साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करा. शहरी व ग्रामीण भागाची पाहणी करा. पाण्याच्या उघड्या टाक्या बंद करा. आरोग्य विभागातील डॉ. परोपकारींचे अभिनंदन करायला पाहिजे. एकटा माणूस किती काम करणार आहे? नवी मुंबई डेंग्यूमुक्त करायची असेल तर भ्रष्टाचार संपवावा लागेल. कंत्राटदार कामाकरता १५ लोकांचे पगार घेत आहे, मात्र त्या ठिकाणी सातच लोक काम करत आहे. एनएमएमटीतही हाच प्रकार आहे. रोगराईशी लढा देण्यासाठी जनजागृती महत्वाची असल्याची सूचना नगरसेवक पाटकर यांनी केली.
*** एफएसआयवरून जुगलबंदी ***
शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर आपली अभ्यासू भूमिका मांडत असताना सत्ताधारी गोटातून एफएसआयचा गलका होत असताना ज्यांना एफएसआयचा फुल्लफार्म माहिती नाही त्यांनी एफएसआयचा उच्चार करू नये असा टोमणा पाटकर यांनी लगावला.
सभागृहनेते जयवंत सुतारदेखील एफएसआयचा गलका करत असताना किशोर पाटकर यांनी सुतारसाहेब माझ्या प्रभागात सिडकोच्या सोसायट्या असल्याने मी सातत्याने एफएसआयच्या विषयावर बोलणारच. तुमच्या शिरवणेत सर्वत्र बारच आहेत. त्या बारसंस्कृतीवर कधीतरी सभागृहात बोला असा खोचक टोमणा नगरसेवक पाटकर यांनी सुतारांना लगावला.