सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे तुर्भेतील माता बाल रूग्णालय सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे सभोवतालच्या ५ प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुविधेसाठी फार हाल होत आहेत. सुरेश कुलकर्णी यांना पालिका प्रशासनाला रूग्णालयाकरता पर्यायी जागा दाखविली होती. नागरिकांचे होत असलेले हाल पाहता महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी जागेवर रूग्णालय सुरू करण्याची मागणी प्रभाग ६९ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका संगीता वासके यांनी केली आहे.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान नगरसेविका वासके सभागृहात बोलत होत्या.
तुर्भेतील माता बाल रूग्णालय बंद असल्याने नागरिक वाशीला जातात, वाशीवाले कोपरखैराणेला पाठवितात आणि कोपरखैराणेवाले नेरूळला जायला सांगतात. यामध्ये रूग्णांचे खूप हाल होत आहेत. या त्रासाला कंटाळून लोक खासगी रूग्णालयात उपचारासाठी जातात. या पाचही प्रभागात श्रमिक वर्ग असून परिस्थितीने गरीब व गांजलेला आहे. हॉस्पिटलचे बिल भागविण्यासाठी या लोकांना दागिने गहाण ठेवावे लागतात अथवा मोडावे लागतात. सुरेश कुलकर्णी यांनी सुचविलेल्या पर्यायी जागेत महापालिका प्रशासनाने रूग्णालय उघडल्यास लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार नसल्याचे नगरसेविका वासके यांनी महासभेदरम्यान सांगितले.