वाशी : नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये असणारे जुने दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) आजमितीला जिर्ण अवस्थेत तसेच फाटक्या अवस्थेत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी शालेय दाखल्यांची तपासणी करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबईतील ग्रामस्थांनी व अन्य लोकांनी पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर या जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षक नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीतत झाले आहेत. आज ग्रामस्थ शाळेमध्ये काही कामकाजास्तव शालेय दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) आणावयास जातात, त्यावेळी दाखल्यांची दुर्दशा झाल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळते. अनेक शाळांमध्ये जुने दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) जिर्ण अवस्थेत तसेच काही ठिकाणी दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) पुस्तिका फाटलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहे. येत्या काही महिन्यात या दाखल्याची (लिव्हिंग सर्टफिकेट) पुस्तिका फाटल्यास ग्रामस्थांना आवश्यकता भासल्यास शालेय दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) देणे अशक्य होणार आहे. त्यामुळे दाखल्याअभावी प्रशासकीय कामकाजात ग्रामस्थांसह अन्य नवी मुंबईकरांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याचा धोका शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयास केला आहे.
महापालिका प्रशासनाने समस्येचे गांभीर्य पाहता महापालिका शाळांशाळांमध्ये जावून दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) पुस्तिकांची तपासणी करावी. जुन्या व जिर्ण झालेल्या दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) पुस्तिकांची डागडूजी करून सुस्थितीत आणण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. याकामी उशिर झाल्यास ग्रामस्थांना तसेच नवी मुंबईकरांना शाळेमध्ये जुने दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) मिळणे अवघड होवून बसेल आणि त्या परिस्थितीतीला सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासनच जबाबदार असेल असा इशारा देत नगरसेवक नामदेव भगत यांनी लवकरात लवकर दाखले (लिव्हिंग सर्टफिकेट) पुस्तिकांची तपासणी करण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.