दिपक देशमुख
नवी मुंबई : दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या विसर्जन सोहळ्यानंतर सातव्या दिवशीचा श्रीगणेशमुर्ती विसर्जन सोहळा देखील नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला असून महानगरपालिका क्षेत्रातील 23 विसर्जनस्थळांवर एकुण 2523 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सातव्या दिवशी बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 305 घरगुती व 12 सार्वजनिक, नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 355 घरगुती व 46 सार्वजनिक, वाशी विभागात 3 विसर्जन स्थळांवर 277 घरगुती व 8 सार्वजनिक, तुर्भे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 284 घरगुती व 13 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 403 घरगुती व 54 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 417 घरगुती, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 150 घरगुती व 6 सार्वजनिक, दिघा विभागात एका विसर्जनस्थळी 168 घरगुती व 25 सार्वजनिक अशा एकुण 2359 घरगुती व 164 सार्वजनिक श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन पार पडले.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उप आयुक्त सुभाष इंगळे व परिमंडळ 2 चे उप आयुक्त सुरेश पाटील हे आपापल्या परिमंडळ क्षेत्रात सहाय्यक आयुक्त व आठही विभाग अधिकारी यांचे सहयोगाने सुयोग्य व्यवस्था ठेवण्यात कार्यरत होते. सर्वच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
23 विसर्जनस्थळांवर संबंधित विभाग अधिकारी हे आपल्या अधिनस्त अधिकारी – कर्मचारी, अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफगार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष होते. श्रीमुर्ती विसर्जनकरीता तराफ्यांची तसेच आवश्यक त्या ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था होती तसेच प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युतव्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था होती. पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा त्याचप्रमाणे स्वागत व सूचना करण्यासाठी विसर्जनस्थळांवर मंच व्यवस्था आणि ध्वनीक्षेपक व्यवस्था उपलब्ध होती. 14 मुख्य तलावांमध्ये मागील तीन वर्षांपासून करण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या निर्धारीत क्षेत्रात भाविक भक्तांनी व मंडळांनी पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून महापालिकेच्या आवाहनास अनमोल सहकार्य दिले.
यानंतर अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या संख्येने होणारे सार्वजनिक मंडळांचे मोठ्या आकारातील श्रीगणेशमुर्ती विसर्जन लक्षात घेऊन तशाप्रकारची व्यवस्था करण्याची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. प्रतिवर्षीप्रमाणेच याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात उंच व्यासपीठ उभारुन विसर्जन स्थळाकडे प्रस्थान करणार्या श्रीगणेशमुर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपन्न होणारा विसर्जन सोहळा आजपर्यंतच्या विसर्जन सोहळ्याप्रमाणे सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यात नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.