नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या स्वच्छ नवी मुंबई मिशन अंतर्गत रविवारी संपूर्ण महापालिका क्षेत्रात विभागाविभागांत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन नागरिकांसोबत स्वच्छता कार्यात सहभाग घेतला तसेच त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छता संदेश प्रसाराचे आवाहन केले. यावेळी महापौर महोदयांसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त सौ. तृप्ती सांडभोर आणि ठिकठिकाणी स्थानिक नगरसेवक-नगरसेविका तसेच विभाग अधिकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत ११ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये लोकसहभागाला महत्व देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज नागरिकांच्या सोयीच्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सहभागासह स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये बेलापूर विभागात से. ६ सी.बी.डी. बस स्टॉप, से. ४ भाजीमार्केट, बेलापूरगांव मच्छीमार्केट, पोलीस वसाहत व पी.डब्लू.डी. वसाहत से. १ सी.बी.डी., सिनिअर सिटीझन असो. से. १५ सी.बी.डी. बेलापूर त्याचप्रमाणे नेरुळ विभागात से. ३ जनता मार्केट, से. २३ जुईनगर मार्केट परिसर, से. १ शिरवणे पेट्रोल पंपाजवळ, गावदेवी मैदान ते समाधान हॉटेल से. १० याठिकाणी, वाशी विभागात से. १ साईबाबा मंदिर, से. ८ सागर विहार, जुहूगांव सी.आय.एस.एफ. कॉलनी साईबाबा मंदिर, से. १५ येथील प्रसाधनगृह ते मान्यवर शॉप याठिकाणी तसेच तुर्भे विभागात से. २ व से. ८ च्या मधील आणि से. १६ व से. १ च्या मधील मोराज-सानपाडा येथील नाल्यावरील पुलालगतचे क्षेत्र, जनता मार्केट पुल ते से. २० ते सी.डब्लू.सी. कॉलनी, तुर्भे नाका ते फायजर रोडच्या दोन्ही बाजूस, ठाणे बेलापूर मार्गावरील स्कायवॉक, से. १९ माथाडी चौक ते अन्नपूर्णा चौक ते सानपाडा सिग्नलचा परिसर व से. १९ फळ बाजारासमोरील सर्व्हीस रोड येथे, कोपरखैरणे विभागात से. ३ येथील बस डेपो व त्यालगतचा परिसर, से. ५ येथील रेल्वेस्टेशन व त्यालगतचा परिसर, से. ७ येथील डी-मार्ट सर्कल, से. ११ येथील फाम सोसायटी ते रिलायन्स फ्रेश पर्यंतचा भाग तसेच घणसोली विभागात सम्राटनगर, साठेनगर (गट क्र. ७०), शिवाजी तलाव (गट क्र. ६९), से. १५ व १६ ए मुकांबिका मार्ग (गट क्र. ६८), से. ४ हावरे चौक (गट क्र. ७३) या भागात त्याचप्रमाणे ऐरोली विभागात से. ३ येथील ऐरोली रेल्वेस्टेशन परिसर व त्यासमोरील बस डेपो, से. १६ येथील जयभवानी मार्केट, ऐरोली नाका तलाव परिसर याठिकाणी त्यासोबतच दिघा विभागात गणेशनगर, विष्णुनगर, इलठणपाडा व संजय गांधी नगर याभागात नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन असलेले आपले नवी मुंबई शहर प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे याकरीता नागरिकांचे सहकार्य लाभत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी यापुढील काळातही नागरिकांनी आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर स्वच्छ राहील याकडे जागरूकतेने लक्ष द्यावे व यामधील त्रुटी लगेच महानगरपालिकेच्या लक्षात आणून द्याव्यात असे आवाहन नागरिकांशी सुसंवाद साधताना केले. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण नक्कीच स्वच्छ शहरांमध्ये देशात नंबर वन ठरू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.