मुंबई : 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नाट्य परिषदेच्यावतीने गवाणकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नाट्यसंमेलनाचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. सातारा आणि ठाणे अशी नावे प्रस्तावित आहेत. गवाणकर यांनी वस्त्रहरण या गाजलेल्या नाटकाचे लेखन केले आहे. वस्त्रहरण या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला. पाच हजार प्रयोगांचा टप्पा गाठणार्या या नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. वस्त्रहरणनंतर गवाणकरांनी मोजकी, पण दर्जेदार नाटकं लिहिली. त्यामध्ये दोघी, वन रूम किचन यांसारख्या नाटकांचा समावेश आहे.
तर व्हाया वस्त्रहरण या आपल्या नाटकातून त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास मांडला आहे. मालवणी भाषेला रंगमंचावर आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.