नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती, कला यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असो.मध्ये शनिवारी (ता.24) सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत महाराष्ट्र 2025ः नागरीकरणाची आव्हाने या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राची माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजीव गणेश नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ता बाळसराफ, महेश तपासे उपस्थित होते. या चर्चासत्राचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते होणार असून चर्चासत्राविषयीची भूमिका खा. श्रीमती सुप्रियाताई सुळे मांडणार आहेत. स्वागतपर भाषण डॉ. संजीव नाईक करणार असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद काळे करणार आहेत. विद्याधर फाटक, सुलक्षणा महाजन, माधव पै, प्रा. अमिता भिडे, डॉ. शरद काळे, डॉ. उपाध्ये आदी तज्ञ मान्यवर नागरीकरण संदर्भातील विविध विषयांवर-समस्यांवर आपले विचार प्रकट करणार आहेत. चर्चासत्राचा समारोप आ. संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
चर्चासत्राची माहिती देताना डॉ. नाईक म्हणाले की, आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये शहरीकरण अत्यंत महत्वाचा टप्पा राहणार आहे. महाराष्ट्रात आजच 50 टक्के शहरीकरण झाले असून पुढील दशकात ते अधिक वेगाने होईल. देशातील नावाजलेले तिसर्या क्रमांकाचे शहर, स्मार्ट सिटी शहरात समावेश असलेले शहर, रहिवाशांच्या प्रथम पसंतीचे शहर अशी स्वतःची ओळख नवी मुंबई शहराने निर्माण केली आहे. शरदचंद्र पवार यांच्या विचारातून आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या कार्यशैलीतून या शहराचा विकास घडलेला आहे, असे ते म्हणाले.
*****
तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. पूर्वीसारखी परिस्थिती आता खेड्यातही राहिली नाही. शहरीकरणाचा वेग वाढत असून यावर नियंत्रण मिळविणे आपल्या हातात नाही. परंतु, वाढत्या शहरीकरणाबरोबर योग्य नियोजन असेल, तर भविष्यात उद्भविणार्या समस्या निर्माण होणार नाहीत. समस्या उद्भविण्याअगोदरच यावर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र 2025ः नागरीकरणाची आव्हाने या विषयावर चर्चासत्र ठेवण्यात आले आहे.
-डॉ. संजीव गणेश नाईक,
कार्यक्रमाचे संयोजक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
****
चर्चासत्रांच्या मालिकेतील आठवे पुष्प
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्र पवार 12 डिसेंबर रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चासत्र मालिका सुरु आहे. या मालिकेतील आठवे चर्चासत्र नवी मुंबई पार पडणार आहे. आतापर्यंत प्रशासनासमोरील आव्हाने, स्त्रीयांचे प्रश्न, शेती-पाणी आणि तंत्रज्ञान, ग्रामविकास, देवस्थानांची सामाजिक जबाबदारी, साहित्य, संस्कृती आणि कला या विषयांवर चर्चासत्रे संपन्न झाली आहेत. या प्रत्येक चर्चासत्रातील परिसंवादावर एक पुस्तिका प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केली जाणार आहे. सर्व 14 चर्चासत्रे पार पडल्यानंतर या चर्चासत्रातील तज्ञ मंडीळ एकत्र बसून महाराष्ट्रासाठी पुढील 10 वर्षांचा विकास आराखडा तयार करणार आहेत. हा आराखडा पुढे ग्रथ रुपाने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती दत्ता बाळासराफ यांनी दिली.
***
चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी येथे नाव नोंदवा
रमेश मोरे- 9004652262
उमेश खाडे- 9892649664
***
विद्याधर फाटक यांचे महाराष्ट्राचे नागरीकरणः समस्या व उपाय या विषयावर सकाळी 11.05 ते 11.50 या वेळेत, माधव पै यांचे नागरी वाहतूक व्यवस्था या विषयावर 12.00 ते 12.50 या वेळेत, अमित भिडे यांचे झोपडपट्ट्या, परवडणारी घरे आणि नागरी जीवन या विषयावर 12.50 ते 01.40 या वेळेत, अरविंद शिंदे यांचे पाणी व्यवस्था या विषयावर 2.30 ते 03.00 या वेळेत, मनोज पाटील यांचे सांडपाणी व्यवस्था या विषयावर 3.00 ते 3.30 या वेळेत, डॉ. शरद काळे यांचे घनकचरा, उर्जा व पर्यावरण या विषयावर 3.30 ते 4.30 या वेळेत, सुलक्षणा महाजन यांचे शहरांचे समावेशक नियोजन या विषयावर 4.40 ते 5.30 या वेळेत आपले विचार मांडणार आहेत.