नवी दिल्ली : पाकिस्तान विरोध व्यक्त करण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणार्या शिवसेनेवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार टीका केली आहे. जेटलींनी केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये भागीदार असणार्या शिवसेनेचे नाव न घेता कान उपटले आहेत.
सध्या काही जण आपला संदेश पोहोचवण्यासाठी तोडफोड, नासधूस हे हिंसाचाराचे मार्ग अवलंबत आहेत. अशा हिंसाचाराच्या घटनेला जेव्हा जास्त प्रमाणात प्रसिध्दी मिळते तेव्हा इतरांनाही अशाच मार्गाने जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. हे खरोखरच निराशाजनक आहे. तोडफोड करण्यापेक्षा चर्चा, वादविवादाचा स्तर उंचावा. जे अशा तोडफोडीच्या घटनांमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर टीका झालीच पाहिजे अशा शब्दात अरुण जेटलींनी शिवसेनेचा समाचार घेतला.
विरोध व्यक्त करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करणार्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असे करुन ते लोकशाहीचा दर्जा उंचावत आहेत की, देश म्हणून भारताची विश्वासर्हता कमी करत आहेत असे जेटली म्हणाले.
मागच्या काही दिवसात शिवसेनेने पाकिस्तान सोबत संबंध जोडण्याला विरोध करण्यासाठी हिंसक आंदोलने केली आहेत. सोमवारीच शिवसैनिकांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांना विरोध करण्यासाठी बीसीसीआयच्या मुख्यालयात धुडगूस घातला होता.