नवी दिल्ली : भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंदर सेहवागने अखेर मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची औपचारीक घोषणा केली. आपल्या 37 व्या वाढदिवसाच्या दिवशी सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.
निवृत्ती जाहीर करताना सेहवागने यापुढे आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी सेहवागने निवृत्तीचे संकेत दिले होते. सेहवाग यापुढे यूएईमधील मास्टर्स चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत खेळणार आहे.
या स्पर्धेमध्ये खेळणार्या क्रिकेटपटूसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणे बंधनकारक होते. या रणजी मोसमात हरयाणाकडून खेळत रहाणार असल्याचे संकेत सेहवागने दिले आहेत.
सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 104 कसोटीत 49.34च्या सरासरीने त्याने 8586 धावा केल्या आहेत. त्यात 23 शतकांचा समावेश आहे. कसोटीत दोन त्रिशतके ठोकणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे.
वनडे कारकिर्दीत 251 लढती खेळताना सेहवागने 35.05च्या सरासरीने 8273 धावा फटकावल्या आहेत. वनडेत 15 शतके त्याच्या नावावर आहेत. वनडेमध्ये 2011 मध्ये सेहवागने इंदूरला वेस्ट इंडिज विरुध्द व्दिशतकही झळकवले होते. 2001 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिके विरुध्द कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने शानदार शतकी खेळी केली होती.
1999 साली मोहालीमध्ये पाकिस्तान विरुध्द त्याने वनडे पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेहवागने 17 हजार पेक्षा जास्त धावा केल्या. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही त्याने चमक दाखवली. आपल्या ऑफस्पिन फिरकीने संघाला गरज असताना त्याने बळी मिळवून दिले होते.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून त्याने एकूण 136 गडी बाद केले. स्फोटक फलंदाज अशी सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्याती होती. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर सेहवाग तुटून पडत असे. मात्र मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममुळे अडीच वर्षापासून तो संघाबाहेर होता.