नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10 शहरांमध्ये नवी मुंबईची निवड झाली असून केंद्रीय पातळीवरील 100 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. केंद्रीय स्तरावरील निवडीतही नवी मुंबईचा समावेश असावा यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने सकारात्मक वाटचाल सुरू असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या स्मार्ट शहराविषयी असलेल्या अपेक्षा आणि संकल्पना यांचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहे.
या कामामध्ये सुनियोजितता असावी व गतिमानता यावी याकरीता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्मार्ट सिटी – वॉर रूम सुरु करण्यात आली असून या विशेष कक्षामधून स्मार्ट सिटी बाबतचे कामकाज चालणार आहे. महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या हस्ते या स्मार्ट सिटी – वॉर रूम चा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, एल.बी.टी. विभागाचे उपआयुक्त उमेश वाघ, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी.व्ही. राव, इटीसी संचालक डॉ. वर्षा भगत, कार्यकारी अभियंता संजय देसाई व अरविंद शिंदे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागाला विशेष महत्व देत असून याकरीता वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृहात नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना आपल्या मौल्यवान सूचना, संकल्पना लिखित स्वरूपात दिल्या व तेथे प्रत्यक्ष संवादातूनही मांडल्या.
अशाचप्रकारे आता वसाहती, सोसायटी, व्यवसाय व उद्योगसमुह, सर्व्हिस इंडस्ट्रीज, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, मंडळे अशा विविध ठिकाणी पोहचून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या स्मार्ट सिटी बाबतच्या संकल्पना लिखित स्वरुपात जाणून घेतल्या जाणार आहेत. नागरिकांचा यामध्ये सहभाग वाढावा आणि त्यांच्या सूचना, संकल्पनांचा उपयोग स्मार्ट नवी मुंबई शहर निर्मितीत व्हावा या भूमिकेतून निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये डिजीटल माध्यमांचे जनमानसातील आकर्षण लक्षात घेऊन सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. याकरीता स्मार्ट सिटीबाबत सूचना करण्यासाठी नागरिक http://mygov.in/home/discuss या भारत सरकारच्या URL संकेतस्थळावर जाऊन discussion forum मध्ये आपली स्मार्ट सिटी विषयीची सूचना थेट नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmconline.com या संकेतस्थळावर देखील या URL ची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तेथूनही नोंदवू शकतात.
त्याशिवाय नागरिकांना नवी मुंबई शहर स्मार्ट करण्यासाठी आपल्या मौल्यवान सूचना नोंदविण्यासाठी https://www.facebook.com/
अशाप्रकारे लेखी, डिजीटल, सोशल अशा सर्वच माध्यमांतून नागरिकांमार्फत प्राप्त होणा-या नवी मुंबई स्मार्ट सिटी विषयीच्या संकल्पना, सूचनांचे संकलन करणे, त्यांचे वर्गीकरण करणे, त्याबाबतचे रिपोर्टस् तयार करणे, फेसबुक – ट्विटर अशा सोशल मिडियामार्फत प्राप्त होणार्या सूचना, संकल्पना प्राप्त झाल्याचे अभिप्राय देणे अशी विविध प्रकारची कामे स्मार्ट सिटी – वॉर रूम मधून चालणार असून नागरिक नोंदवित असलेल्या उल्लेखनीय सूचना, संकल्पनांचा विचार स्मार्ट सिटीसाठी राबविण्यात येणा-या कामांमध्ये प्राधान्यक्रम ठरविताना होणार आहे. या वॉर रूमला प्रत्येक विभागप्रमुखांनी दिवसातून काही वेळ भेट द्यावी अशा सूचना आयुक्तांनी याप्रसंगी केल्या.
त्यामुळे आपले नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या सूचना कराव्यात, संकल्पना मांडाव्यात आणि विशेषत्वाने इंटरनेट फ्रेंडली नागरिकांनी mygov.in या वेबसाईटवर जाऊन तसेच फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मिडियावरून आपल्या स्मार्ट सिटीविषयीच्या संकल्पना मांडाव्यात असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.