नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या तहकुब सर्वसाधारण सभेप्रसंगी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंजूरीसाठी सादर केलेल्या विविध सुविधा प्रस्तावांस महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मान्यता मिळाली.
यामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत राबविण्यात येणारे पुर्वापार विविध प्रकारचे १७ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपक्रम तसेच ७ नियोजित उपक्रम याकरीता १ कोटी ९२ लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजित खर्चास मंजूरी देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर यांच्या पदनामाने सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा, महापौर श्री राज्यस्तरीय व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा, भजन महोत्सव स्पर्धा, महापौर मॅरेथॉन, कॅरम स्पर्धा, जलतरण स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, ४० प्लस क्रिकेट स्पर्धा अशा १७ प्रकारच्या वैविध्यपूर्ण स्पर्धा उपक्रमातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उभे केले जात आहे. तसेच यामधून क्रीडा रसिकांनाही दर्जेदार खेळ अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. या उपक्रमांमध्ये अधिक भर घालत नवी मुंबई हे सांस्कृतिक शहर व क्रीडा नगरी म्हणून उदयास यावे यादृष्टीने समुहनृत्य वा समुहगान स्पर्धा, थलॅटिक्स स्पर्धा, स्नुकर स्पर्धा, स्केटींग स्पर्धा, आंतर महानगरपालिका स्पर्धा, क्रिकेट प्रिमिअर लिग असे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून अधिकाधिक गुणवंत खेळाडू व कलावंत घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे बेलापूर विभागातील से. ३० / ३१, आग्रोळी गावठांण विस्तार योजना या विकसित होत असलेल्या भागात काही इमारतींची कामे पूर्ण झाली असून काही प्रमाणात नागरिक राहण्यास आले आहेत. तसेच काही इमारतींची कामे प्रगतीपथावर आहेत. या भागातील मलनि:स्सारण व्यवस्था सक्षम होण्याच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याठिकाणी आर.सी.सी. मलनि:स्सारण वाहिन्या टाकण्याच्या १ कोटी ४९ लक्ष अंदाजपत्रकीय रकमेच्या कामास सर्वसाधारण सभेची मंजूरी प्राप्त झाली. गाव-गावठाण, सिडको विकसित भाग तसेच झोपडपट्टी भागातही आवश्यकता लक्षात घेऊन मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे, शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली.
त्याशिवाय घणसोली गांव येथील मार्केटमधील गाळा क्र. ३ आणि भू.क्र. १६०, से. ४४, करावे येथील गाळा क्र. ६ ची जागा दुकान/गाळे/कार्यालये, किराणा दुकान, घरगुती वापराचे साहित्य, विशेष सेवा व्यवसाय, रेडिमेड फुड, डॉक्टर-वकिल-आर्किटेक्ट यांनी व्यवसायिक कार्यालये, क्लिनिक, कोचिंग क्लासेस, बँक, ए.टी.एम. सेवा याकरीता ५ वर्षांच्या कालावधीकरीता परवानगी व अनुज्ञा तत्वावर देण्याच्या प्रस्तावास त्याचप्रमाणे भू.क्र. ७१,७२,७३ से. ११ सी.बी.डी. बेलापूर येथील पार्किंग व कॅफेटेरीया मधील किऑक्स रेडिमेड फुड, ज्युस, अल्पोपहार, स्टेशनरी/ झेरॉक्स, फुलाचे दुकान अशाप्रकारच्या नागरिका उपयोगी प्रयोजनाकरीता ५ वर्षांच्या कालावधीकरीता परवानगी व अनुज्ञा तत्वावर देण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजूरी प्राप्त झाली.