वाराणसी : उत्तर प्रदेशात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातच भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाला.
वाराणसीत भाजपाला फक्त ७ जागा कशाबशा जिंकता आल्या. तर ५८ पैकी तब्बल ५० जागांवर भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द मोदींनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजपा पुरस्कृत उमेदवारांचाही पराभव झाल्याने भाजपाला हा पराभव जिव्हारी लागला आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनऊ मतदारसंघातही भाजपाला २८ पैकी केवळ ४ जागा जिंकता आल्या. तर केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्या देवरिया मतदारसंघातही भाजपाला ५६ पैकी अवघ्या ७ जागांवरच समाधान मानावे लागले.
पंचायत निवडणुकीत येथील मतदारांनी समाजवादी पार्टीलाही मोठ्या प्रमाणावर दणका दिला आहे. अनेक ठिकाणी सपा मंत्र्यांच्या नातेवाईकांना मतदारांनी साफ झिडकारले आहे. रोहनिया, रायबरेली, सोहावल आणि जौनपुर येथे निवडणुकीसाठी उभे असलेल्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या नातेवाईकांचा दारुण पराभव झाला.
असदउद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम ने यावर्षीच्या निवडणुकीत चार जागा जिंकून उत्तर प्रदेशातही एमआयएमने आपले बस्तान मांडले आहे. बलरामपुरमधील वार्ड नंबर-३, नसीमा, बलरामपुरमधील वार्ड नंबर- २९ आणि आजमखान यांच्या बालेकिल्ल्यातही एमआयएमने धडक दिली आहे.