नागपूर : शहरात खाकी वर्दीचा जरब राहिला नसल्यामुळे तोतया पोलिसांनी शहरात धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. सोमवारी तीन वेगवेगळ्या घटनांत पोलिस असल्याची बतावणी करून तीन वृद्धांना लुटल्याच्या घटना उघडकीस आल्या. वृद्ध आणि महिलांच्या सुरक्षेवर पोलिस विभाग भर देणार असल्याचा पोलिस आयुक्त शारदाप्रसाद यांचा दावा फोल ठरत आहे. शहरातील महिला आणि वृद्धांना लुटमार आणि चेनस्नॅचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वसुलीत गुंग असलेल्या पोलिस कर्मचार्यांमुळे शहराची सुरक्षा वार्यावर असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. उपराजधानीत तोतया पोलिसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर पंधरा दिवसांत लुटल्याच्या घटना समोर येत आहेत. तोतया पोलिसांमुळे सामान्य व्यक्ती आता खुर्याखुर्या पोलिसांकडेही संशयाच्या नजरेने पहायला लागला आहे.
पहिल्या घटनेत, गणेश मोतीरामजी नेवारे (वय ६४, रा. सुभाषनगर चौक) सोमवारी सव्वाआठ वाजता मॉर्निंग वॉक करीत होते. मंगलमूर्ती चौक ते सुभाषनगर टी पॉइंटकडे जाणार्या रोडवर दोन युवकांनी अडवून पोलिस असल्याची बतावणी करून सोनसाखळी व अंगठी लुटून पळ काढला. दुसर्या घटनेत, व्यंकटेश्वरा राव पी. (वय ४१, रा. इन्कम टॅक्स कॉलनी) हे साडेआठ वाजता ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. रामकृष्णनगर रोडवर दोन युवकांनी पोलिस असल्याचे सांगून पोलिस खात्याचे ओळखपत्र दाखवले. त्यानंतर सोनसाखळी व दोन अंगठ्या (किंमत ४० हजार रुपये) हिसकावून पळ काढला. या दोन्ही प्रकरणांत प्रतापनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तिसर्या घटनेत, सदानंद दत्तात्रय चौधरी (वय ६६, रा. भरतनगर) या सकाळी सकाळी सात वाजता दूध विकत घेऊन घरी परतत होत्या. अंबाझरीतील भरतनगरात दोन युवकांनी त्यांना अडविले. पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांची सोनसाखळी व दोन अंगठ्या (किंमत ७८ हजार रुपये) पिशवीत बांधून देण्याचा बहाणा केला. नंतर दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. या वाढत्या लूटमारीमुळे वृद्ध आणि महिला त्रस्त असून पोलिस कर्मचारी मात्र पॅट्रोलिंगच्या नावावर मौज करीत आहेत.
वृद्धांना लुटणार्या तोतया पोलिसांची केशरचना आणि हालचाली हुबेहूब पोलिसांसारख्या असतात. या सर्व बाबी पोलिसांच्या संपर्कात राहिल्यानंतर शिकता येतात. वाहतूक शाखेने शहरात अनेक पोलिस मित्र (एटीपी) नेमले आहे. ते सर्व पोलिसांसारखे हावभाव-हातवारे, पोलिस भाषा आणि पोलिसांसारखी केशरचना करून असतात. त्यामुळे त्यांच्यावर संशय निर्माण झाला आहे. यासोबतच आता पोलिस मित्रांची भरती पोलिस विभाग मोठ्या प्रमाणात करीत आहेत. सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात नेहमी खासगी पोलिस मित्र उभे असतात. सावज शोधणे आणि त्यांना पोलिस कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी करणे, एवढेच काम ते करीत असतात. त्यामुळे तोतया पोलिसांमध्ये यांचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.