मुंबई : कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेवरून सध्या रणकंदन सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे पुन्हा राज ठाकरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.
त्यामुळे आता शिवसेनेकडील दोन पर्यायापैकी एक भाजपसोबत होता आणि दुसरा मनसेला एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्याचा आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हॅलो ब्रदर म्हणून कल्याण-डोंबिवलीचे ‘कल्याण’ करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ५२ जागांसह मोठा पक्ष बनलेल्या शिवसेनेने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. मात्र, केडीएमसीसह कोल्हापूरमध्येही भाजपचा महापौर बसवण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. हे उद्धव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा निर्णय तसा असेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. भाजपाला सेनेसोबत यायचे नाहीये, हे दानवेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. ते त्यांच्या मार्गाने जाणार असतील तर आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलेय. यामुळे आता राज ठाकरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.