मुंबई : शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी डाळीच्या महागाईचा मुद्दा तर उपस्थित केला, त्यापलिकडे मात्र ही मंत्रीमंडळ बैठक खेळीमेळीच्या वाचावरणात पार पडली. दुसरीकडे रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आपली भांडणे संपल्याचे जाहीर केले आहे.
कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना भाजपाने एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले. सरकारमध्ये असूनही कुणी सरकारला रस्त्यावर आणण्याची भाषा केली, तर कुणी वाघाच्या जबड्यात हात घालून दात बाहेर काढण्याची भाषा केली. या सगळ्यामुळे शिवसेना-भाजपा सरकारचे काय होणार याबाबत उत्सुकता होती. त्यातच राज्यमंत्रीमंडळाची पहिल्या बैठकीत काय होणार, शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मंत्रीमंडळ बैठकीत डाळींच्या महागाईचा मुद्दा उपस्थित करून एक आठवड्यात डाळी स्वस्त करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतले.
एकीकडे डाळीचा मुद्दा वगळता राज्य मंत्रीमंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर निवडणुकीत पुकारलेल्या जाहीर युद्धाबाबत युद्धबंदीच जाहीर केली.
शिवसेना-भाजपाचा सरकारमधील घरोबा वर्षभराचा आहे. अनेक मुद्यावरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. महानगरपालिका निवडणुकीतील टीकेने या मतभेदांवर कळस चढवला होता. मात्र मतभेद आणि भांडणांपेक्षा सत्ता महत्त्वाची याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे. त्यामुळेच ही युद्धबंदी जाहीर करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली नाही. आता सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला भाजपाचीही गरज भासू शकते. याच गरजेतून शिवसेनेने भाजपाविरोधात उपसलेली तलवार तूर्त तरी म्यान केली आहे. कल्याण डोंबिवलीत एकहाती सत्ता मिळाली असती तर मात्र शिवसेनेची आजची भाषा वेगळी असती.