नवी मुंबई : ‘कचरा नाही कचरा’ असे म्हणत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा वसा अंगिकारत नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ग्रीन सोसायटी फोरम या सेवाभावी कलासंस्थेच्या माध्यमातून साकारलेल्या नादुरूस्त संगणकांतील विविध भाग वापरून तयार केलेला भारताचा नकाशा सर्वार्थाने लक्षवेधी ठरला आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या भारताच्या नकाशाच्या प्रतिकृतीचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
ग्रीन बिल्डींगचे गोल्ड मानांकन लाभलेल्या महापालिका मुख्यालय इमारतीत तिसर्या मजल्यावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या दालनात हा ई-वेस्ट पासून तयार केलेला भारत देशाचा नकाशा लावलेला असून यामध्ये संगणकातील एकुण २२ नादुरूस्त मदर बोर्ड वापरण्यात आले आहेत. मदर बोर्ड वापरून तयार केलेला भारताचा नकाशा आणि भारतमाता ही भारतीय नागरिकांच्या मनातील भावना एकत्र करून या रचनेस ‘मदर इंडिया बोर्ड’ असे अत्यंत कल्पक नाव देण्यात आले आहे. या बोर्डचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात देशाच्या नकाशात महाराष्ट्र राज्य आणि त्यातही नवी मुंबईचे वेगळे स्थान आयकॉनिक महापालिका मुख्यालय इमारतीसह ठळकपणे दर्शविण्यात आले आहे.
ई वेस्टचे करायचे काय ? या जागतिक पातळीवरील गहन प्रश्नाला आपल्या परीने शोधलेले हे कलात्मक उत्तर असून यामधून पर्यावरण रक्षण-संवर्धन आणि सुशोभिकरण या दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. हा ‘मदर इंडिया बोर्ड’ म्हणजे ई-वेस्ट मधून तयार केलेला केवळ एक कलाविष्कार नसून त्यासोबतच देशभक्तीची प्रेरणा यामधून प्रसारीत केली जात आहे. सोबतच कचर्याचा पुनर्वापर करून आपले नवी मुंबई शहर स्वच्छ आणि पर्यावरणशील स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असे आवाहनही या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून केले जात आहे.
४.५ फूट उंच व ४ फूट रूंद असा हा ‘मदर इंडिया बोर्ड’ तयार करण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी लागला असून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन सोसायटी फोरम संस्थेचे कलावंत किशोर बिश्वास, संकल्पना रचनाकार बिनॉय के, ग्राफिक डिझायनर अबू रमिझा व ऑल्विन ऑगस्टीन, अरीफ मोहम्मद शेख, पत्रकार जसपाल सिंग नोएल व मच्छिंद्र पाटील या समुहाने ही राष्ट्रप्रेम जागृत करणारी पर्यावरणहिताय अभिनव संकल्पना राबविली आहे.
या ‘मदर इंडिया बोर्ड’ अनावरणप्रसंगी महापौर व आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शिक्षण विभाग उपआयुक्त अमरीश पटनिगीरे, क्रीडा विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, करनिर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी, परिमंडळ उपआयुक्त सुभाष इंगळे व सुरेश पाटील, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, कार्य अभियंता संजय देसाई, सहा. आयुक्त सुभाष गायकर व साहेबराव गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संपूर्ण समुहाचे राष्ट्रप्रेम जपत केलेल्या कल्पक निर्मितीबद्दल मनापासून कौतुक करीत हा ई- वेस्ट कलाविष्कार देशात अभिनव असल्याचे मत व्यक्त केले. अशा प्रकारचे टाकाऊपासून टिकाऊ प्रकल्प नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी राबवावेत असे या समुहाला आवाहन करीत कलाप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनीही असे अभिनव प्रयोग आपल्या स्तरावर राबवून नवी मुंबई शहराची पर्यावरणशील स्मार्ट सिटी अशा वेगळी ओळख निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.