नवी मुंबई : गेल्या तीन महिन्यापासून महापालिका आयुक्तांनी प्रभागाचा पाहणी दौरा करावा यासाठी लेखी पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. पाहणी अभियानाची तारीख निश्चित करून नंतर ती स्थगित करण्याचा प्रकार सातत्याने घडत असल्याने महापालिका आयुक्तांचा लवकरात लवकर पाहणी दौरा न झाल्यास महासभेतील कामकाजादरम्यान जमिनीवर बसूनच कामकाजात सहभागी होणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या प्रभाग ८७च्या नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
महापालिका आयुक्तांनी प्रभाग ८७ मधील समाविष्ठ होणार्या नेरूळ सेक्टर आठ आणि सेक्टर दहामधील काही परिसरात पाहणी दौरा आयोजित करावा, ज्यायोगे परिसरातील नागरी समस्यांची व असुविधांची महापालिका आयुक्तांना कल्पना येईल, त्यातून पाठपुराव्याच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल या हेतूने शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंनी २८ जुलै २०१५ रोजी महापालिका आयुक्तांना पाहणी दौर्याविषयी लेखी निवेदनही सादर केले. या घटनेला तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असून या कालावधीत चार ते पाच वेळा महापालिका आयुक्त कार्यालयातून पाहणी अभियानाविषयी तारखा कळविण्यात आल्या व शेवटच्या क्षणी त्या तारखांसह कार्यक्रमही स्थगित करण्यात आला. याउलट सभोवतालच्या प्रभागांमध्ये महापालिका आयुक्तांनी पाहणी अभियान दौरेदेखील केले.
पाहणी अभियान कार्यक्रमामध्ये दुजाभाव होत असल्याचे पाहून ३ नोव्हेंबर २०१५ रोजी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पुन्हा एकवार लेखी निवेदन सादर करत पाहणी अभियान आयोजित करण्याची मागणी करत लवकरात लवकर पालिका प्रशासनाकडून पाहणी अभियानाविषयी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महापालिका कामकाजादरम्यान आपण जमिनीवर बसूनच सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.