नवी मुंबईः यंदा अपुरा पाऊस पडला असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सद्यस्थितीत उपलब्ध पाणी साठ्याचा पुढील कालावधीकरीता पर्याप्त वापर करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील
गुरुवार आणि शुक्रवार (बुधवारी रात्री १२.०० ते शुक्रवारी रात्री १२.०० वाजेपर्यंत ) असा एकूण ४८ तासांचा शटडाऊन घोषित केला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भागातील मूळ गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोलीगाव, ऐरोली नोडमधील काही भाग, राबाडागोठिवली, घणसोलीगाव, नोसिलनाका आणि तुर्भे स्टोअर आदि भागातील थेट नळजोडण्यांद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शटडाऊनच्या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच सदर भागात पुढील दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये सदर भागामध्ये टँकरद्वारे तसेच मोरबे धरणातून काही भागात उपलब्धतेनुसार काही प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर नवी मुंबई महापालिकेमार्फत येत्या ६ नोव्हेंबर रोजी भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवरील देखभालदुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा येत्या ६ नोव्हेंबर
रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत एकूण १४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे,
घणसोली आणि ऐरोली या विभागात ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सदर कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.