मुंबई : मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाल्यानंतर शुक्रवारी मात्र शेअर बाजारात निराशेचे वातावरण आहे. जागतिक बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर देखील दिसून येतो आहे. गुरुवारच्या सत्रात अमेरिकी बाजार १.२५-१.५ टक्केघसरणीसह बंद झाले. तसेच आशियातील बाजारात देखील ०.७५-२ टक्केघसरण दिसून येते आहे.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५,६४०.०८ पातळीवर व्यवहार करत आहे. त्यात २२६.८७ अंशांची घसरण झाली आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९ अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी ७८०० पातळीच्या खाली ७,७५९.४० पातळीवर व्यवहार करतो आहे. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे ०.८८ टक्के आणि ०.८४ टक्के घसरण झाली आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात देखील मोठ्य प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू आहे. बँकिंग, कॅपिटल गूड्स, रियल्टी आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्री सुरू आहे. आयटी निर्देशांक १ टक्के तर बँक निफ्टी १ टक्के नुकसानासह ११६,८०० पातळीच्या खाली पोचला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात कोल इंडिया, बीपीसीएल, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर वेदांत, केर्न इंडिया, लुपिन, हिंडाल्को, झी मनोरंजन, ओएनजीसी, सिप्ला आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.