नवी मुंबई : केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या पाहणीनुसार नवी मुंबईस देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले असून टॉप टेन मध्ये असणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. हे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून लोकसहभागाला विशेष महत्व देण्यात येत आहे.
स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थीदशेत असल्यापासून लहान वयातच मुलांवर झाला तर स्वच्छता ही सवय होईल आणि त्यातून शहराचे स्वच्छ व सुंदर भविष्य घडेल हे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंतही स्वच्छतेचा संदेश पोहचेल यादृष्टीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या वतीने शालेय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वॉल पेन्टींग, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वर्ग व शाळा परिसर स्वच्छता अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी.अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या विशेष विद्यार्थ्यांनी, केंद्र संचालक डॉ.वर्षा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने, केंद्राच्या इमारतीतील एका भिंतीवर स्वच्छतेविषयी चित्रे काढून एक उत्तम संदेश जनमानसात प्रसारीत केला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण, परिमंडळ 1 उपआयुक्त सुभाष इंगळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त तृप्ती सांडभोर, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी उपस्थित राहून विशेष विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहीत केले.
अशाच प्रकारचे अभिनव उपक्रम इतर शाळांतूनही राबविले जाणार असून यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक शाळेने स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयक जाणीव जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.