नवी मुंबई : सन २०१५-२०१६ वर्षात अपुरा पाऊस झाला असल्याने सद्यस्थितीत उपलब्ध पाणी साठ्याचा, पुढील कालावधीकरीता योग्य वापर करण्याचे दृष्टीने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रत्येक आठवड्यातील गुरूवार व शुक्रवार म्हणजेच बुधवारी रात्री १२.०० ते शुक्रवारी रात्री १२.०० वाजेपर्यंत असा एकूण ४८ तासांचा शटडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भागातील मूळ गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोलीगाव, ऐरोली नोडमधील काही भाग, राबाडा गोठिवली, घणसोलीगाव, नोसीलनाका व तुर्भे स्टोअर इ. भागातील थेट नळजोडण्यांद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शटडाऊनच्या कालावधीत बंद राहील. तसेच सदर भागात पुढील दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या कालावधीमध्ये गुरूवारी उपरोक्त भागामध्ये टँकरद्वारे तसेच काही भागात उपलब्धतेनुसार मोरबे धरणातून काही प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शुक्रवार दिनांक २०/११/२०१५ रोजी भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातील मान्सुननंतरच्या नियमित देखभाल – दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक २०/११/२०१५ रोजी सकाळी ८.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत एकूण १० तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक २०/११/२०१५ रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही, तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.