नवी मुंबई : महापालिका आयुक्तांनी आपल्या प्रभागाला भेट द्यावी याकरता प्रभाग ८७ च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी लोकशाहीचे निर्णायक आयुध वापरताच आयुक्तांनीदेखील प्रभाग ८७ ला भेट देण्यास लवकरच येत असल्याचे मान्य करत तसे लेखी देण्याची तयारीही दर्शविली. शुक्रवारच्या महासभेत जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा पवित्रा घेताच आयुक्तांनी प्रभाग भेटीबाबत मान्य केले.
प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी २८ जुलै २०१५ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले होेते. प्रभाग भेटीदरम्यान मनपा आयुक्तांना नागरी असुविधांची व नागरी समस्यांची प्रत्यक्ष कल्पना देवून नागरी सुविधांकरता आणि नागरी समस्या निवारणाकरता पाठपुरावा करणे शक्य होईल, या हेतूने नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी प्रभाग भेट अभियानाकरता महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा कायम ठेवला. आयुक्त कार्यालयाकडून यादरम्यान नगरसेविका मांडवे यांना चार ते पाच वेळा प्रभाग भेट अभियानाविषयी तारीखही कळविण्यात आली. पण अखेरच्या क्षणी भेट अभियान स्थगित करण्यात आल्याचे कळविण्यात आले.
आयुक्तांच्या पाहणी अभियानाला होत असलेला विलंब पाहून नगरसेविका मांडवे यांनी ३ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत मनपा आयुक्त प्रभाग भेटीसाठी न आल्यास महसभेच्या कामकाजात आपण जमिनीवर बसूनच सहभागी होणार असल्याचा इशारा दिला होता.
शुक्रवारी महासभेदरम्यान कामकाज सुरू झाल्यावर श्रध्दाजंलीचा कार्यक्रम होताचा नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंनी आयुक्तांना सांगून आपण जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होत असल्याचे सांगितले. यावर पालिका आयुक्तांनी तात्काळ आपण आगामी आठवड्यात प्रभाग ८७च्या भेटीस येत असल्याचे सांगितले. तसे लेखी स्वरूपात आपण देत असल्याचे मनपा आयुक्तांनी महासभेदरम्यान सांगितले.
शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांची कार्यप्रणाली आक्रमक असून प्रभाग विकासाकरता त्या महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. नगरसेविका सौ. मांडवे यांच्या प्रभागाबाबतच्या आक्रमकतेची एक झलक महासभेदरम्यान पहावयास मिळाली.