वाशी / वार्ताहर
नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन कर्मचारी- अधिकार्यांकडून यापुर्वी करण्यात आलेल्या विविध मागण्यांवर व प्रलंबित प्रश्नावर विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये पालिका आयुक्त वाघमारे यांनी सर्व कर्मचार्यांच्या समस्या समजून घेऊन सकारात्मक दृष्टीकोन दाखविला. सेवा ज्येष्ठता यादी, प्रलंबित पदोन्नत्या व सेवाशर्ती नियमावली व आकृतीबंध यासारख्या अनेक विषयावर नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी पालिका आयुक्त वाघमारे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत कर्मचार्यांनी सादर केलेल्या त्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न आयुक्तांनी समजून घेतल्या.
पालिका आयुक्त वाघमारे यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवून सर्व मागण्या मान्य केल्याचे संघटनेचे पदाधिकर्यांनी सांगितले आहे. पालिका आयुक्त वाघमारे कर्मचार्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांनी मागणी केलेले कागदपत्रे त्वरीत देण्याचे आदेश पालिका उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांना दिले. पुढील सात दिवसांत महासंघाला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यालयाची जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
त्याचप्रमाणे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेषतः डॉ. रमेश निकम यांच्या पदोन्नतीच्या बाबतीत अन्याय होत असल्याचा मुद्दा महासंघातर्फे मांडण्यात आला. यावर पालिका आयुक्त वाघमारे यांनी डॉ.
निकम यांचा पदोन्नत्तीचा प्रस्ताव १५ दिवसांच्या आत सादर करण्याच्या
सूचना उपायुक्त सिन्नरकर यांनी दिल्या आहेत. आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात शशिकांत आवळे, सचिव डॉ. कैलास गायकवाड, रविंद्र सावंत, डॉ. वैभव झुंजारे, मदन वाघचौडे, जयंत कांबळे, संध्या अंबादे, डॉ. दयानंद बाबर, प्रविण गाडे, राजेश ओहोळ, विलास चाबूर आदि पदाधिकारी उपस्थित होते.