नवी मुंबई : पाण्याच्याबाबतीत सुजलाम सुफलाम असणार्या व स्वमालकीचे मोरबे धरण असणार्या नवी मुंबईकरांवर महापालिका प्रशासनाने पाणीकपात लागू केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबई शिवसेना भाजपाच्या वतीने महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली. महापालिका सभागृहातील
शिवसेना-भाजपा नगरसेवकांनी व पदाधिकार्यांनी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांना रिकामे हंडे दाखवित नवी मुंबईकरांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि भाजपाचे गटनेते रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक या धडक अभियानामध्ये सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना भाजपाच्यावतीने करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांच्यासह अन्य महिला नगरसेविका डोक्यावर रिकामे हंडी व मडकी घेवून महापालिका मुख्यालयातील आंदोलनात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाल्या. शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारीदेखील यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.