*कॉंग्रेसच्या रविंद्र सावंत यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना अचानक पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने व पाणीपुरवठा वेळेत कपात झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारेंना लेखी निवेदन सादर करत मनपा कार्यक्षेत्रातील जलवाहिन्यांसह नळजोडण्याची युध्दपातळीवर तपासणी करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे पाण्याकरता सुजलाम सुफलाम शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहे. परंतु अपेक्षित न झालेला पाऊस आणि पाईपलाईन फुटणे यामुळे नवी मुंबईकरांना आज पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहील्यास मार्च महिन्याच्या सुरूवातीला नवी मुंबई शहर हे टँकरचे शहर म्हणून ओळखले जाण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती निर्माण होवू नये आणि टँकरचे शहर या बिरूदावलीची नामुष्की या शहरावर ओढवू नये म्हणून महापालिका प्रशासनाने जलवाहिन्यांची व नळजोडण्यांची तपासणी युध्दपातळीवर करावी याकरता आपणास हे लेखी निवेदन सादर करत असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्व जलवाहिन्यांची मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून शक्य तितक्या लवकर पुन्हा एकवार तपासणी करून घ्यावी. कोठे जलवाहिन्या गळक्या असतील तर त्या तात्काळ विनाविलंब दुरूस्त करून घ्याव्यात. कारण आजची पाण्याबाबतची भयावह परिस्थिती पाहता गळक्या जलवाहिन्या नवी मुंबईकरांकरता भयावह संकट ठरणार आहे. तसेच मनपा कार्यक्षेत्रातील चाळी, डोंगराळ भाग, स्लम एरिया, झोपडपट्टी, खासगी व सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, गावठाण भागातील इमारती, टॉवर, व्यावसायिक कार्यक्षेत्र, एमआयडीसी भाग आदी परिसरातील नळजोडण्यांची पुन्हा एकवार पाणीपुरवठा विभागाकडून तपासणी करावी. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचे सर्वत्रच ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलले जात आहे. प्रत्येक विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकार्यांना या अनधिकृत नळजोडण्यांची माहिती असणारच. त्यांना आपण विश्वासात घेवून अनधिकृत नळजोडण्यांविरोधात शीघ्र गतीने मोहीम राबवावी. ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून पाणीचोरी होत असेल अशा घटकांच्या विरोधात आर्थिक दंड ठोठावून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
नवी मुंबईकरांना जाणवत असलेली पाणीटंचाई व सुरू झालेली पाणीकपात ही तर सुरूवात आहे. अद्यापि पावसाळा येण्यास साडेपाच महिन्याचा अवकाश आहे. त्यामुळे मोरबे धरण साठ्यात उपलब्ध असलेले पाणी जपून वापरणे ही जितकी नवी मुंबईकरांची जबाबदारी आहे, तितकीच जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे की त्यांनी अनधिकृत नळजोडण्यांवर व पाणीचोरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना दंडीत करावे. पाणीसमस्या नजीकच्या काळात भयावह स्वरूप धारण करणार आहे. पाणीसमस्येचा भस्मासूर निर्माण होवू नये याकरता समस्येचे गांभीर्य ओळखून महापालिका प्रशासनाने अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून होत असलेली पाणीचोरी रोखण्यासाठी आजपासूनच व्यापक प्रमाणावर मोहीम उघडण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.