मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आठवडाभरात १६ कोटी ५० लाखांची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.
नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच १ जानेवारी रोजी साडेचारशेहून अधिक थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दहा कोटींचा गल्ला जमवून रितेश देशमुख स्टार ’लय भारी’ या सिनेमाचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. नाना पाटेकरांच्या अभिनयाने सजलेल्या ’नटसम्राट’ या सिनेमाला रिलीजच्या आठवडाभरानंतरही प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेली ‘नटसम्राट’ ही रंगभूमीवरील अजरामर कलाकृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पेलले. नाना पाटेकर यांनी यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. नानांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तर पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. दरम्यान, ‘नटसम्राटची ३० टक्के रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची घोषणा नाना पाटेकर यांनी सिनेमाच्या रिलीजपूर्वी केली होती.