अहमदनगर : शनी शिंगणापूरच्या भूमीत इतिहास घडला आहे. कारण शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. अनिता शेटे आता अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झाली आहे.
महिलांच्या चौथर्याच्या प्रवेशावरून वाद ओढावल्याने शनी शिंगणापूर देवस्थान देशभरात चर्चेत आलं होतं. गेल्या महिन्यात एका महिलेनं बंदी असतानाही शनीच्या चौथर्यावर प्रवेश केला होता. त्यानंतर पवित्र्य भंग पावल्याचा दावा करून पुजार्यांनी शनीच्या शीळेवर अभिषेक घातला होता. महिलांना दिल्या जाणार्या हीन वागणुकीमुळे राज्यभरातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली होती.
त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या विश्वस्तपदाच्या निवडणुकीमध्ये दोन महिलांनी अर्ज भरले होते. यंदा प्रथमच अनिता शेटे आणि शालीनी लांडे या दोन महिलांची विश्वस्तपदी निवड झाली होती. निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज अध्यक्षपदावरही अनिता शेटे यांची निवड झाली आहे.
दरम्यान आता नव्या अध्यक्ष चौथर्यावर महिलांना प्रवेशाची मुभा देणार का याकडे अवघ्या भक्तांचं लक्ष लागलं आहे. पण नियोजित अध्यक्षांनी मध्यंतरी एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन, आपण परंपरांचा आदर केला पाहिजे असं म्हणत, आपल्या भूमिकेची कल्पना दिली होती.