मुंबई : जगात घातकी कारवाया करणार्या आयएसआयएस दहशतवादी संघटनेची पाळेमुळे देशभर पसरली असताना ही पाळेमुळे उखडण्याचे काम तपासयंत्रणांनी हाती घेतले आहे. आयएसआयएसच्या जाळ्यात अडकलेल्या शहरातील पाच संशयितांवर एटीएसने करडी नजर ठेवली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून अटक केलेल्या रिझवान अहमदच्या चौकशीत पाच जणांची माहिती समोर आली त्यामुळे याचां कसून शोध सुरू असल्याची माहिती एटीएसमधील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
रिझवान हा अनेकदा मुंबईत येऊन गेल्याची माहिती एटीएसच्या चौकशीत समोर आली आहे. प्रत्येक वेळी मुंबईत आल्यानंतर रिझवान येथील संपर्कात असलेल्या तरूणांना भेटत होता. अशा पाच तरूणांचा उल्लेख रिझवानच्या चौकशीत झाला आहे, मात्र हे पाच संशयित कोण? आणि कुठे राहतात याबाबत एटीएसला अद्याप माहिती नाही. त्यांनी या पाच संशयितांवर करडी नजर ठेवली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातून आणखी एक आयएसआयएस दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मुंबईत येणार असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती त्यानुसार, एनआयएने प्रथम ठाणे रेल्वे स्थानकांवर सापळा लावला होता. मात्र ही रेल्वे ठाणे स्थानकात थांबत नसल्याची माहिती समोर येताच, त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानक गाठले मात्र तो तेथे आढळून आला नाही.
तसेच उत्तर प्रदेशहून येणा़र्या दुसर्या रेल्वेची वाट पाहत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एनआयएचे पथक बसले होते. काही वेळातच आलेल्या रेल्वेची तपासणी केली, मात्र या संशयिताचा तपास लागला नाही. त्याचे लोकेशन ट्रेस केले असता, तो भांडुपमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर अचानक त्याने मोबाईल बंद केला. उत्तर प्रदेशहून आलेली दुसरी रेल्वे ही ठाणे रेल्वे स्थानकात थांबली. मात्र हा संशयित दहशतवादी तेथूनच भांडुपला गेल्याचे समोर आले. एनआयएच्या या गोंधळामुळे आयएसचा हा संशयित फरार झाला. कारण हाच संशयित मुंबईतील पाच तरूणांना भेटण्यास येणार असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.
दरम्यान, आयएसआयएस दहशतवादी संघटनेसाठी मुंब्रा येथील मुदब्बीर शेख, औरगांबाद येथील इम्रान पठाण आणि उत्तर प्रदेशचा रिझवान अहमद हे तिघे टॉप थ्री कमांडर्स म्हणून आयएसआयएससाठी जिहादी तरूणांची भरती, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जागेचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे.
रिझवान अहमदच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने, एटीएसचे एक पथक अधिक तपासासाठी उत्तर प्रदेशला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.