नाशिक : आरोपींचे पलायन, कैद्यांमध्ये मारामार्या, मोबाईल सापडणे या घटना थांबत नाहीत तोच आता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन होमगार्डकडून गांजा आणि मोबाईल सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही होमगार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्यवर्ती कारागृहात चौकशी पथकाने अचानक छापा मारला असता त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या दोन होमगार्डकडून 80 ग्रॅम गांजा व मोबाईल हँडसेट्स सापडले. या पूर्वी नाशिकच्या टिप्पर गँगच्या आरोपींकडे मोबाईल आणि निरोध सापडले होते.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील अशा पद्धतीने कारागृहात मोबाईल सापडल्याने कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दरम्यान, सर्वात सुरक्षित असल्याचा दावा करणार्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असताना त्याबाबत अद्यापही कोणाताच निर्णय झालेला नाही. मात्र आता जेलमध्ये कार्यरत असलेले होमगार्डकडून चक्क मोबाईल आणि गांजा चोरुन कारागृहात नेल्याने एकुणच कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.