अहमदनगर : शनिशिंगणापूर मंदिरातील चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातला तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. महिला प्रवेशासंदर्भात अहमदनगरमधील बैठक निष्फळ ठरल्याने यावर आज कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या प्रश्नावर आता मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल.
शनि चौथर्यावरील महिला प्रवेशाबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला, भूमाता रणरागिणी ब्रिगेड, शनिशिंगणापूर समिती सदस्या आणि स्थानिक नेते उपस्थित होते. प्रथा-परंपरा पाळण्याबद्दल ठाम असल्याचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. त्यामुळे यावर ठोस तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली.
परंतु यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यी घेतील, यावर सर्वांचं एकमत झालं. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या सदस्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी या वादावर काय तोगडा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.