पनवेल(प्रतिनिधी) उत्कृष्ट आयोजन, सर्वाधिक बक्षिसे, समाजप्रबोधन व जनजागृतीसाठी नवी मुंबई परिसरात तसेच रायगड जिल्हयात नामांकित असलेली ’खारघर मॅरेथॉन २०१६’ स्पर्धा आज (रविवार, दि.०७) खारघर मधील सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळ संपन्न होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’मेक ईन इंडियाAस्कीलड इंडिया’ या महत्वपूर्ण संकल्पनेचे घोषवाक्य घेवून रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उदघाटन सकाळी ०७ वाजता नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ पाटील, शरीर सौष्ठवपटू सुनित जाधव असणार आहेत. तर परितोषिक वितरण सकाळी ९.३० वाजता बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून अंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरूर असणार आहेत.
राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय अशा प्रकारात १४ गटात ही मॅरेथॉन स्पर्धा होणार असून स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ’तीन लाख ४० हजार रूपयांची’ रोख रक्कमेची पारितोषिके तसेच आकर्षक चषक, ट्रॅकसूट देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने मॅरेथॉन अंतर्गत झालेल्या वकृत्व व निबंध स्पर्धेचाही बक्षिस समारंभ यावेळी होणार आहे. स्पर्धकांचे स्वागत व व्यवस्थेसाठी सर्व समित्या आणि स्वयंसेवक सज्ज झाले असून मॅरेथॉनविषयी जागृकता वृध्दींगत करण्यासाठी या स्पर्धेचा लाभ जास्तीतAजास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, चेअरमन व एम.डी.परेश ठाकूर, खारघर मॅरेथॉन कमिटीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे मुख्य समन्वयक चंद्रशेखर पन्हाळे यांनी केले आहे.