नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध कला, क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जात असून यावर्षी प्रथमत:च मिस नवी मुंबई २०१६ हा अभिनव उपक्रम यू अँड आय एन्टरटेंटमेन्ट यांच्या सहयोगाने दि. २६ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
या सौंदर्य स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या ३५० हून अधिक स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी १४ स्पर्धक निवडण्यात आले आहेत. या अंतिम फेरीतील निवडक स्पर्धकांचे कॅज्युअल ड्रेस राऊंड, ट्रेडिशनल ड्रेस राऊंड तसेच फॅन्सी गाऊन राऊंड अशा तीन फे-या होणार असून पहिल्या फेरीत स्पर्धकांची ओळख होणार असून दुसरी फेरी प्रश्नांची असणार आहे. यामधून निवडलेल्या ६ अंतिम स्पर्धकांना तिस-या फेरीत समान प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. यामधून प्रथम तीन क्रमांकाची पारितोषिके दिली जाणार असून मिस नवी मुंबई २०१६ हा किताब प्रदान केला जाणार आहे. याशिवाय बेस्ट हेअर, बेस्ट आईज, बेस्ट टॅलेंट, बेस्ट फोटोजेनीक पर्सनॅलीटी अशी चौदा स्वतंत्र पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
या संपूर्ण स्पर्धेचे सुत्रसंचालन रेडिओ फिवर या एफ एम चॅनलचे आर जे अनुराग पांडे करणार असून यावेळी इंडियन आयडॉल मिनल जैन गीत सादरीकरण करणार आहे. तसेच संन्यास बँड संगीत सादरीकरण करणार आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे २६ फेब्रुवारी २०१६ रोजी संपन्न होणा-या या मिस नवी मुंबई २०१६ स्पर्धेचा शुभारंभ सायंकाळी ७.०० वा. तसेच पारितोषिक वितरण समारंभ रात्री १०.०० वा. माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून याप्रसंगी खासदार श्री. राजन विचारे, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार श्री. संदीप नाईक, आमदार श्री. नरेंद्र पाटील, उप महापौर श्री. अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले, परिवहन सभापती श्री. साबु डॅनिअल आणि इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी मिस नवी मुंबई २०१६ या अभिनव स्पर्धेप्रसंगी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. प्रकाश मोरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.