मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात शनिवारी (26 मार्च) देवनार येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे. कचर्याचे डम्पिंग देवनार ऐवजी महापालिकेला तळोजा येथे जी जागा देण्यात आली आहे तिथे करावे, अशी मागणी आहे. देवनार, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या भागातील रहिवाशांनी या रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.
सदर रास्ता रोको आंदोलनात देवनार येथे कचर्याच्या गाड्या, ट्रक्स व कचर्याचे डम्पर यांना अडवण्यात येईल व कचर्याचे डम्पिंग करण्यापासून मज्जाव करण्यात येईल.
28 जानेवारी 2016 रोजी देवनार डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती. त्यानंतर 19 मार्च 2016 रोजी पुन्हा आग लागली. पण त्याबाबत अजूनही पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. आग लागल्याने या भागात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. चेंबूर, मानखुर्द, गोवंडी या भागातही धुराचे लोट पसरलेले आहेत. या धूर प्रदूषणामुळे येथील परिसरामध्ये टीबी, मलेरिया, दमा यांसारख्या जीवघेण्या रोगांची लागण झालेली आहे.
या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरातून शहरातील इतर भागातही पसरेल, अशी सार्थ भीती व्यक्त केली जात आहे. कालच येथे या धुराच्या त्रासाने एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. येथील नागरिक या समस्येमुळे अत्यंत त्रासलेले आहेत. सदर देवनार डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करून डम्पिंगची व्यवस्था त्वरित प्रभावाने अन्यत्र करावी, अशी मुंबई काँग्रेसची ठाम मागणी आहे.