मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सराफांच्या बाजूने उभे राहिले आहेत. केंद्र सरकारने सराफांचा प्रश्न सोडवला नाही, तर शिवसेना सराफांच्या बाजूने आंदोलन करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.अबकारी करात एक टक्का वाढ केल्याने सराफ आक्रमक झाले आहेत. त्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे.जनतेने नव्या आशेने नवं सरकार निवडून दिलं. एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, पण आता सुवर्णकारांच्या घरातल्या चुलीतून धूर बाहेर पडत नाही. पाकिस्तानच्या ज्या लोकांनी पठाणकोटवर हल्ला केला, त्यांना रेड कार्पेट आणि सुवर्णकारांशी चर्चा नाही. ‘मेक इन इंडिया’चे ढोल पिटले, परदेशी उद्योगजकांशी चर्चा केली, पण सुवर्णकारांशी चर्चा का नाही”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. सराफांच्या प्रश्नाबाबत शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी, असा सल्लाही उद्धव यांनी दिला.