सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
ठाणे : भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली ठाणेकरांना आला दिवस ढकलावा लागत आहे. दररोज ठाण्यातील २५ ते ३० लोकांना चावा घेण्याच्या घटना उजेडात येत आहे. लहान मुलांवरही भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्लेही केले आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी केवळ कागदोपत्रीच केली जात असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे.
ठाणे शहरामध्ये ५५ हजाराहून अधिक भटकी कुत्री आहेत. सामाजिक संस्थांनी मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देवून सावध करण्याचा प्रयत्न केला असला तरी मनपा प्रशासन भटक्या कुत्र्यांबाबत उदासिनता दाखवित आहे. ठाणे शहराबरोबरच घोडबंदर, कळवा, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, दिवा कौसा या परिसरातील रहीवाशांकरता भटकी कुत्री चिंतेची बाब बनली असून रात्री घराबाहेर पडणेही अवघड होवून बसले आहे. या परिसर झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखला जात आहे. या भागातील रस्त्यांवर मटन-मच्छिची रात्री उशिरापर्यत विक्री होत असल्याने भटक्या कुत्र्यांना सहजासहजी आहार उपलब्ध होत आहे. रात्री कामावरून घरी येणाऱ्यांना भटकी कुत्री चावा घेत असल्याने लोक एकटेदुकटे फिरण्यास टाळाटाळ करत असून रेल्वे स्टेशनवरून एकत्रच ये-जा करू लागले आहेत.
मनपा प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत केला जाणारा दावा असत्य असल्याचा गंभीर आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे. २००६ पासून आजपर्यत ४० हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. शहरातील ६० टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी दिवसेंगणिक भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच
चालली आहे. २०१४-१५ साली ४०६८ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. २०१३-१४ मध्ये एकाही भटक्या कुत्र्याची नसबंदी करण्यात आलेली नाही.