सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : दिघा-यादवनगर पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधात कॉंग्र्रेस-शिवसेना-भाजपा अशी महायुती तयार झाली असून एका अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून लढत दिली जाणार आहे. महापालिका सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता उपभोगत असताना पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच विरोधात शिवसेना-भाजपाच्या मदतीने दंड थोपटण्याचा प्रयास कॉंग्रेसने चालविला आहे.
एकीकडे कॉंग्र्रेसमुक्त भारत हे अभियान भाजपाकडून व्यापक प्रमाणात राबविले जात असतानाच दुसरीकडे लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाने कॉंग्रेसचा पालापाचोळाही शिल्लक ठेवला नसताना नवी मुंबईत कॉंग्रेसी नेतृत्व शिवसेना-भाजपासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात लढा देत आहे.
एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेमतेम काठावरचे बहूमत प्राप्त झाले आहे. अपक्ष नगरसेवकांना चुचकारत राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे बहूमत प्राप्त केले. कॉंग्रेसला महत्प्रयासाने मनपा सभागृहात दोन आकडी संख्याबळ गाठता आलेे. या पार्श्वभूमीवर सभागृहात राजकीय अस्थिरता कायम राहू नये म्हणून गणेश नाईक यांनी कॉंग्रेसला सत्तेत भागीदार करून घेताना त्यांना उपमहापौरपदासह आरोग्य समिती सभापतीपद देवू केले. कॉंग्रेसने विश्वासघात केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीतून व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसने महायुतीत सहभाग घेवून सेना-भाजपाची साथ देवू केल्याने कॉंग्रेसी घटकांमध्येही नाराजीचा सूर आळविला जात आहे. एका कॉंग्रेसी पदाधिकार्यांचे त्याबाबतचे पत्र सोशल मिडीयावरही ‘व्हायरल’ झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही यापूर्वी कॉंग्रेसचा केवळ वापरच करून घेतला आहे. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेतला असल्याचे सांगत काही कॉंग्रेसी पदाधिकारी खासगीत बोलताना या महायुतीचे समर्थन करत आहेत. यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकरता कॉंग्रेसने काम करायचे आणि पालिका निवडणूकीत कॉंग्रेसबरोबर युती टाळायची असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेकदा केेले असल्याचे कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांकडून सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व दहशतवाद असा प्रचार महायुतीकडून सुरूवातीच्या टप्प्यात केला जात असला तरी ही पोटनिवडणूक जिंकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघड जाणार नाही. या प्रभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामआशिष यादव यांचा बालेकिल्ला असून त्यांचा येथील मतदारांवर कमालीचा प्रभाव आहे. पोटनिवडणूककीत स्थानिक समस्या महत्वाच्या ठरतात. दहशतवाद मुद्दा तकलादू ठरत असल्याचे चिंचपाडा पोटनिवडणूकीत नवी मुंबईकरांना पहावयास मिळाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचपाडा पोटनिवडणूकीत हाच दहशतवादाचा मुद्दा घेत टाहो फोडला असला तरी स्थानिक मतदारांनी शिवसेनेलाच दणदणीत मतांनी विजयी केले होते.