मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही वार्षिक मालमत्ता जाहीर करा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत केली आहे. तसंच सेवाहमी कायदा असूनही अधिकाऱ्यांची दफ्तर दिरंगाई का? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला आहे.मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांना अटक केली होती. मात्र त्यानंतर जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली.त्यानंतर आज विधानसभेत बोलताना बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. तलवारीपेक्षा कलमेने लोक जास्त मेले. काय काम करता, हा प्रश्न लोक अधिकाऱ्यांना नाही तर आमदारांना विचारतात. एक महिला हृदयरोगाने आजारी आहे, ती रडते म्हणून आम्ही मंत्रालयात जातो, तर अधिकारी उत्तर देतो, मुख्यमंत्र्यांकडे जा. सेवा हमी कायदा असतानाही, दफ्तर दिरंगाई आहे. यावर केलेली कारवाई सभागृहासमोर आली पाहिजे. हे अधिकारी ढोरं ठेवल्यासारखं बसतात, असं बच्चू कडू म्हणाले.उपसचिवाचं नाव मला माहित नव्ह. मंत्रालयात कर्मचारी आंदोलन करतात. पण आम्ही मंत्रालयात आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होईल. तरीही जे आमदार सोबत येतील त्यांना घेऊन मी 21 तारखेला मंत्रालयात आंदोलन करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.