- मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून फोन आल्याच्या प्रकरणात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत ९४२३०७३६६७ या क्रमांकावर कोणताही कॉल आला नाही. तसेच या क्रमांकावरून कोणताही कॉल करण्यात आलेला नसल्याचे मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाइलवर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या घरातून फोन आले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत झाल्यानंतर आम्ही ९४२३०७३६६७ या क्रमांकाचे सर्व तपशील तपासले अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून एकनाथ खडसेंना फोन आले होते असा आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शनिवारी केला होता. मेनन यांचे हे आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी फेटाळून लावले. मात्र आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करताना प्रीती मेनन यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. मेनन यांनी आरोप केले असले तरी तशी तक्रार आपणाकडे केलेली नाही, असे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
दाऊदच्या कराची येथील पत्त्यावर नमूद असलेल्या चार विविध दूरध्वनी क्रमांकांवरून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात खडसे यांना कॉल आले, असा आरोप करताना प्रीती मेनन यांनी संबंधित कागदपत्रांचा हवाला दिला आणि खडसे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही मेनन यांनी केली. मनीष लीलाधर भंंगाळे या जळगावच्या तरुणाने पाकिस्तानी दूरसंचार कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून ही माहिती काढल्याचे त्यांनी सांगितले.
हॅकिंगच्या माध्यमातून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत ही माहिती काढण्यात आली. त्यानुसार, या प्रकरणात ५ पाच भारतीय क्रमांकांचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली. त्यात महाराष्ट्रातील महसूल मंत्री खडसे यांच्या मोबाइल क्रमांकाच्या समावेश आहे. याप्रकरणी, अधिक चौकशी करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे प्रीती मेनन यांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत खडसे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मेनन यांनी केली.
विशेष म्हणजे प्रीती मेनन यांची पत्रकार परिषद संपताच मनीष भंंगाळे याने त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत खडसे यांना दाऊदच्या घरातून फोन केले गेले असा आरोप केला. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याने मी स्वतंत्रपणे माहिती देत असून मला याबाबत अनेकांकडून आॅफर आल्या तसेच ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, असे भंगाळे याने सांगितले.
तर हॅकिंग प्रक्रियेत आयडिया कंपनी, पाकिस्तान टेलिकॉम कंपनीच्या डेटातून या कॉलची माहिती मिळाली. शिवाय, याकरिता खास दोन-तीनवेळा दुबईला जाऊन आलो, असेही भंगाळे याने सांगितले.
मोबाइल क्रमांक वापरात नाही.
आरोप फेटाळताना खडसे म्हणाले, ९४२३०७३६६७ या आपल्या मोबाइल क्रमांकाचा उल्लेख केला आहे, तो गेल्या एक वर्षापासून वापरात नाही. या क्रमांकावर या काळात आंतरराष्ट्रीय कॉल आलेला नाही किंवा त्यावरून कॉल परदेशात केलेला नाही. संबंधित कंपनीने तसे लेखी कळविले आहे. हा मोबाइल क्रमांक क्लोन करून तो वापरला गेला असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पाकमधील या क्रमांकावरून खडसेंना फोन
दाऊदच्या पत्नीच्या नावे असलेल्या विविध दूरध्वनी क्रमांकांवरून खडसे यांच्या नावे असलेल्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आल्याचा आरोप आहे. ते दूरध्वनी क्रमांक असे : ०२१-३५८७१६३९, ०२१-३५८७१७१९, ०२१-३५८७१८३९, ०२१-३५३६०३६०