अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगरसेवकपद गोत्यात
नवी मुंबई प्रतिनिधी
कॉंग्रेसच्या नगरसेविकेने फितुरी केल्याने नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची लॉटरी लागलेल्या शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांचे आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे नगरसेवकपद अडचणीत आले आहे.
सिडकोच्या जागेवर अनधिकृत चाळ बांधल्याची लेखी तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आणि विद्यमान कोपरखैरणे तालुकाध्यक्ष केशव म्हात्रे यांनी १८ मे २०१६ रोजी महापालिकेकडे केली असून या दोघांचे नगरसेवकपद रदद करण्याची मागणी नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली आहे. कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे आयुक्त मुंडे या प्रकरणी कोणती कारवाई करतात? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
अनिता पाटील या कोपरखैरणे भागातील प्रभाग क्रमांक ३९च्या तर शिवराम पाटील हे प्रभाग क्रमांक ४०चे नगरसेवक आहेत. या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन कोपरखैरणे सेक्टर २० येथील विठठल रुक्माई मंदिराजवळ असलेल्या सिडकोच्या भुखंड क्रमांक १६८१वर चाळीचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम करण्यासाठी सिडको किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी काढलेली नाही. संबधीत सिडकोच्या भुखंडाची घरपटटी देखील नगरसेविका अनिता पाटील आणि त्यांचा मुलगा विकी यांनी स्वतःच्या नावावर केली आहे, असे श्री म्हात्रे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हंटले आहे.
महापालिका अधिनियिमाच्या कलम १०-१ ड नुसार कोणताही लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनधिकृत बांधकामाशी संबधीत असला तर त्याचे नगरसेवकपद रदद करता येते. दोरीला साप म्हणून काठीने बडविण्याचा प्रकार नगरसेवक शिवराम पाटील पालिकेच्या सभांमधून करीत असतात. पालिकेच्या महासभा आणि स्थायी सभांमधून विनापरवाना बांधकामांविरोधात गळा काढणारे नगरसेवक शिवराम पाटील यांनीच स्वतः केलेल्या अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पुराव्यानिशी आता बाहेर आल्याने नैतिकतेला धरुन त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.