कॉग्रेसचा पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ व नेरूळ सेक्टर २ व ४ परिसरात रस्त्याच्या कोपऱ्यावर होणारे शौच व लघुशंका, यामुळे परिसरात दुर्गंधी व बकालपणाचा विळखा पडल्याने जुईनगर परिसर हगणदारीमुक्त करण्यासाठी कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगा विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्याकडून गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेरिला या पाठपुराव्याची पालिका प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. सोमवारी सकाळी मनपा पथकाने या ठिकाणी भेट देवून रहीवाशांची चर्चा करून समस्या जाणून घेतली. या परिसरात किमान ६ सार्वजनिक शौचालयाची व एक सार्वजनिक मुतारीची निर्मिती करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्याबाबतचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या पथकाकडून स्थानिक रहीवाशांन यावेळी सांगण्यात आले.
देशामध्ये स्वच्छ भारत अभियानअंतर्गत जोरदार स्वच्छता अभियान राबविले जात असून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही या मोहीमेची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईतील जुईनगर परिसर येत नाही का, असा प्रश्न करून सर्वप्रथम नवी मुंबईतील जुईनगर परिसर हगणदारीमुक्त करण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व स्वंयरोजगार विभाग, काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदनातून वारंवार केली होती.
पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या गांवदेवी चौकामध्ये सांयकाळच्या वेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिलाही बसलेल्या असतात. लघुशंकेची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. या ठिकाणी छोटेखानी मुतारी अथवा ई-टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणीही सावंत यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती.
जुईनगर सेक्टर २४ परिसरामध्ये पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस खासगी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. रेल्वे रूळालगत असणार्यान संरक्षक भिंतीलगतचा रस्ता व तेथील अंतर्गत रस्त्यावरून जाताना नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना दुर्गंधीचा वास सहन करत तोंडावर रूमाल ठेवून ये-जा करावी लागते. या ठिकाणी सांयकाळपासून पहाटेपर्यत रस्त्यावर आणि परिसरातील उघड्यावर लोक शौचासाठी बसलेले पहावयास मिळतात. या ठिकाणी मनपा प्रशासनाने सार्वजनिक शौचालय बांधावे याकरता रविंद्र सावंत गेल्या काही महिन्यापासून पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत आहे. सातत्याने लेखी तक्रारपत्रे सादर करून सावंत यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभाग अधिकारी आदी सर्वांकडे जुईनगर परिसर हागणदारीमुक्त करण्याकरता पाठपुरावा कायम ठेवला होता.
जुईनगर सेक्टर २४ येथे पेट्रोलपंपापासून पुढे आल्यावर तलावाच्या बाजूला बाराही महिने मुले, रहीवाशी उघड्यावर लघुशंका करताना पहावयास मिळतात. त्यामुळे स्मशानभूमीच्या कोपऱ्यावर लघुशंकेकरता छोटेखानी मुतारीची व्यवस्था या ठिकाणी मनपा प्रशासनाने करावी याकरताही रविंद्र सावंत लेखी पाठपुरावा केला आहे.
नेरूळ सेक्टर २ व ४ परिसरातील स्मशानभूमी रस्ता ते वाधवा टॉवरपर्यतच्या रस्त्यावर तसेच सेक्टर ४च्या उद्यानामध्ये मोठ्या संख्येने सकाळ व संध्याकाळी रहीवाशी चालण्यासाठी येत असतात. या ठिकाणीदेखील कोठेही लघुशंकेची व्यवस्था नसल्याने या परिसरात रस्त्याच्या कोपऱ्यावर छोटेखानी मुतारी अथवा ई-टॉयलेट बसविण्याची मनपा प्रशासनाकडे सावंत यांच्याकडून मागणी केली जात आहे.
सोमवारी सकाळी मनपा प्रशासनाकडून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांना मनपाचे अधिकारी जुईनगरच्या समस्या पाहण्यासाठी येत असल्याचे कळविण्यात आले. मनपाचे कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी जुईनगर सेक्टर २४ परिसराची व नेरूळ सेक्टर २-४ परिसराची पाहणी केली. या पाहणी अभियानात रवींद्र सावंत, कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव संध्या कोकाटे आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जुईनगर सेक्टर २४ मधील गांवदेवी मैदान, गणेश मैदान, पेट्रोलपंपाशेजारी, स्मशानभूमीच्या कोपऱ्यावर, खासगी सोसायट्यांच्या बाजूला आणि सेक्टर २ व ४च्या स्मशानभूमी मार्गावर अशा सहा ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची गरज असल्याचे स्थानिक रहीवाशांनी मनपा पथकाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत मनपाच्या संबंधित विभागाकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी स्थानिक रहीवाशांना देण्यात आले.