आढावा प्रभागाचा, पंचनामा विकास कामांचा
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एप्रिल 2015 मध्ये झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये अनेक प्रस्थापित मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला. अनेकांचे गढ उध्दवस्त झाले. या निवडणूकीतून अनेक जायंट किलर नवी मुंबईमध्ये त्या त्या विभागात उदयाला आले. या जायंट किलरमधील एक असणारा गिरीश म्हात्रे हा युवक. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी या युवकाने चमत्कार घडविला. गेली 15 वर्षे या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक होता. परंतु गिरीश म्हात्रेंनी या ठिकाणची 15 वर्षाची राजकीय मक्तेदारी मोडीत काढत घड्याळाची टिकटिक प्रभाग 95 मध्ये ठिकाणी सुरू केली. महापालिकेच्या तिजोरीत विकासकामांकरता पैसा नसल्याने 111 प्रभागातील विकासकामे संथ गतीने सुरू आहेत. परंतु पालिका प्रशासनाच्या माध्यामातून नेरूळ गाव व प्रभागातील अन्य परिसराचा कायापालट करण्याच्या जिद्दीने संघर्ष करणार्या गिरीश म्हात्रे आज नेरूळ नोडमध्ये चर्चेचा विषय आहे.
प्रभाग क्रं 95 हा पालिका मतदारसंघ नेरूळ नोडमध्ये मोडतो. दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागामध्ये 4400 मतदार पालिका निवडणूकीच्या वेळी होते. नेरूळ गाव, मुळ गावठाणाचा भाग, सेक्टर 20 मधील सी व डी ब्लॉकमधील साडे बारा टक्केच्या इमारतीचा भाग, रामलीला मैदान,सारसोळे बसडेपोर, सेक्टर 10 मधील अरूणोदय सिडको सोसायटी, मनोरमा, गेहलोत, शिवदर्शन आदी सोसायट्यांचा या प्रभागात समावेश होत आहे. मनपा निवडणूकीच्या अगोदर राजकीय उलथापालथ झाली. नेरूळ गावातील काँग्रेसचे दिग्गज असणार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नेरूळ गावात वर्षानुवर्षे शिवसेनेचे काम करणारे के.एन.म्हात्रे व त्यांचे युवा पुत्र गिरीश म्हात्रे या जोडीसह काम करणार्या शिवसैनिकांनी शिवसेनेचे अस्तित्व जिवंत ठेवले होते. गिरीश म्हात्रेंनी गेल्या काही वर्षात विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून नेरूळ गाव भगवामय करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होेते. राजकीय स्थित्यंतरामुळे तिकीट वाटपात अन्याय होणार असल्याचे व वर्षानुवर्षे शिवसेनेत काम करूनही आपल्याला डावलले जाणार असल्याचे निश्चित झाल्यावर गिरीश म्हात्रेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. नेरूळच्या ग्रामस्थांनी अन्य रहीवाशांनी गिरीशसारख्या समाजकारणाला सर्वस्व वाहिलेल्या युवकाला स्वीकारले. गावातील नागरी समस्यांचा प्रचार करत नागरी सुविधा देण्याचे आश्वासन देत निवडणूक जिंकली. अर्थात या विजयामध्ये गिरीशच्या समाजकारणात इतकाच नेरूळ गावातील युवकांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदारांचे योगदान महत्वाचे आहे.
गावात अनेक ठिकाणी मल:निस्सारण वाहिन्यांची कामे झालेली नव्हती. पाणीटंचाईसह अन्य नागरी समस्यांचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर गिरीश म्हात्रेंनी निवडणूक लढली. 1656 मते मिळवित तब्बल 500 पेक्षा अधिक मतांनी गिरीश म्हात्रे एप्रिल 2015च्या सार्वत्रिक निवडणूकीत दणदणीत विजय मिळवित नेरूळ नोडमधील जायंट किलर हा तुरा आपल्या शिरपेचात गिरीशने रोवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा लोकनेते गणेश नाईकांनी युवा जायंट किलरला सभागृहात प्रवेश करतानाच विद्यार्थी व युवक कल्याण समितीचे सभापतीपद दिले.
वर्षभरात समस्यांचा पाठपुरावा करत गिरीश म्हात्रेंनी परिसराची सुधारणेच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. पालिका तिजोरीलाही निधीच्या दुष्काळाची झळ पोहोचल्याने संपूर्ण नवी मुंबईतच नागरी कामाची गती संथ आहे. पालिका निधीची वाट न पाहता गिरीश म्हात्रेंनी स्वखर्चातून ठाकूर आळीत स्वखर्चाने कलव्हर्टचे काम केले आहे.
नेरूळ सेक्टर 18 येथील तलावाजवळची कचराकुंडी व मढवी आळीत प्रवेश करतानाची कचराकुंडी हटविण्यात आली. या दोन ठिकाणी कचरा संकलनाची पर्यायी सोय करण्यात आली. या दोन कचराकुंड्या हटविल्याने त्या त्या ठिकाणचा बकालपणा संपुष्ठात आला. प्रभागातीूल चार सार्वजनिक शौचालयाचे लवकरच नुतनीकरण व डागडूजीचे काम सुरु होणार आहे. प्रभागातील जलवाहिन्यांवर 22 लाख रूपये खर्च होणार असून लवकरच या कामाचे टेंडर निघणार आहे. मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याच्या कामास लवकरच सुरूवात होणार आहे.
याशिवाय विविध क्रिडास्पर्धाचे आयोजनही वर्षभराच्या कालावधीत गिरीश म्हात्रेंनी केलेले आहे. कबड्डी स्पर्धा, नगरसेवक चषक, आधार कार्ड व पॅनकार्ड शिबिर, नेरूळ युवकांकरता एनपीएल चषक असे कार्यक्रम गिरीश म्हात्रेंनी आयोजित केले होते.
28 वर्षाचा हा युवा नगरसेवक प्रभागाचा कायापालट घडविण्यासाठी परिश्रम करत आहे. उर्विेरत चार वर्षात प्रभागातील समस्यांचे निवारण झालेले पहावयास मिळेल असा विश्वास गिरीश म्हात्रे बोलून दाखवित आहेत.