नवी मुंबईः ‘सिडको’चे माजी संचालक तथा नेरुळमधील शिवसेना नगरसेवक नामेदव भगत यांचे वडिल रामा मारुती भगत यांचे अल्पशा आजाराने १ जुलै रोजी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात ७ मुले, २ मुली, सुना, जावई आणि नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.
मुळचे नेरुळ गाव येथील रहिवाशी आणि वारकरी सांप्रदायातील असलेले रामा
मारुती भगत यांचा शेती आणि मच्छीमारीचा व्यवसाय होता. आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळत ते सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्य देखील करीत होते. पहिल्यांदा नेरुळ गाव ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी सन १९७८ ते १९८४ असे तब्बल सहा वर्षे ग्रामपंचायत उपसरपंच पद
सांभाळले. सुमारे दहा वर्षापूर्वी त्यांच्या पत्नी वच्छलाबाई भगत यांचे निधन झाले. त्या कै. रामा भगत यांनी प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मुलांना दिलेली शिकवण आणि त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळेच त्यांचे चिरंजीव नामदेव भगत यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. कै. रामा भगत यांच्या सूनबाई इंदुमती भगत या देखील राजकारणात सक्रिय आहेत. कै. रामा भगत यांच्यावर गेले महिनाभर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. १ जुलै रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. यानंतर दुपारच्या सुमारास नेरुळ गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.