आयुक्त मुंढेंचा राष्ट्रवादीला दे धक्का
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या २१ वर्षांच्या ईतिहासात नगरसेवकांना पहिल्यांदाच अनधिकृत बांधकाम प्रकरणी आपले पद गमवावे लागले आहे. याआधी काही नगरसेवकांना जात प्रमाण पडताळणीमध्ये अपूर्ण कागदपत्रांमुळे पद गमावावे लागले आहेत. दिघामधील अनधिकृत इमारत बांधकामामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेले ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चे नगरसेवक नवीन मोरेश्वर गवते, नगरसेविका अपर्णा नवीन गवते आणि दीपा राजेश गवते या नगरसेवकांवर आयूक्तांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. आयूक्त मुंढेंच्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. महापालिका स्थापनेपासूनची पहिलीच घटना असल्याने अन्य नगरसेवकांचे सुध्दा धाबे दणाणले आहे.
नवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत चांगलाचा गाजला आहे. दिघ्यात झालेल्या ९९ अनधिकृत बांधकामांवर सिडको, नवी मुंबई महापालिका व एमआयडीसी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. मात्र या अनधिकृत बांधकामांमध्ये नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे असल्याची माहीती आरटीआय कार्यकर्ते राजीव मोहन मिश्रा यांना मिळाली होती. या महितीनुसार मिश्रा यांनी महापालिका आयूक्तांकडे या तीनही नगरसेवकांचे पद निलंबन करावे अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अपर्णा गवते यांच्या व त्यांचे पती नवीन गवते या दोघांच्या नावावर अनधिकृत बांधकाम असल्याचे कागदोपत्री पुरावे मिश्रा यांना मिळाले होते तर दिपा गवते यांचेही पती राजेश गवते यांच्या नावावर अनधिकृत बांधकाम असल्याचे निष्पन्न झाले होते. हे नगरसेवक दाम्पत्य एम.के गवते अण्ड सन्स या नावाने दिघा परिसरात बांधकाम करत होते. गवतेंनी दिघा परिसरात केलेल्या अनेक बांधकामांतील घरे नागरिकांना विकून त्यांची फसवणूक केल्याचे गुन्हेही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या सुनावणीदरम्यान गवते नगरसेवकांनी नगरसेवकांना निलंबित करण्याचे अधिकार आयुक्तांना नसल्याचा दावा करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत समोर ठेवली होती. तर आयूक्तांच्या कारवाईपासून आपला बचाव व्हावा यासाठी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. पण कारवाईचे अधिकार आयुक्तांचे असल्याचे सांगत गवतेंची याचिका फेटाळून लावली होती. यानुसार आयुक्त मुंढेंनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १०(१) (डी) या कलमान्वये नवीन गवते,अपर्णा गवते व दिपा गवते यांचे पद निलंबित करण्यात आल्याची माहीती अतिरिक्त आयुक्त अंकूश चव्हाण यांनी दिली आहे. आयुक्तांच्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ३ ने कमी होऊन ४९ ईतके राहीले आहे. मात्र राष्ट्रवादी सोबत असलेले अपक्ष व काँग्रेसचे नगरसेवक त्यामुळे सत्तेवरुन पायउतार होण्याचा धोका तुर्तास तरी टळला असला तरी नवी मुंबई महापालिका इतिहासातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी निलंबन होण्याची ही पहिलीच घटना असल्याने अन्य नगरसेवकांचे आयुक्तांच्या निर्णयाने धाबे दणाणले आहे.
> चौकट :—–
> १):- आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईचे आरटीआय कार्यकर्ते ब्रिजेशकुमार मिश्रा यांनी स्वागत केले आहे.आयूक्तांच्या कारवाईमुळे दिघ्यात अनधिकृत बांधकाम करुन निष्पाप नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना चांगला धडा मिळाला आहे.
> २):- नवीन गवते
आयुक्तांनी जो निर्णय दिला आहे या संदर्भात आम्ही न्यायालयात जाणार आहे.एक प्रकारे आमच्या वर हा अन्याय झाला आहे.