- ठाणे – ठाणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून सहा वेगवेगळया तरुणांकडून १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या विष्णु मोरे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील नौपाडा परिसरातील रहिवाशी योगिता मांडवकर यांच्या मुलीला ठामपामध्ये लिपीक म्हणून नोकरी लावण्याचे अमिष त्याने दाखविले होते. पालिकेतील मोठया साहेबांची ओळख असल्यामुळे कायमस्वरुपी नोकरी लावण्याची त्याने बतावणी करुन त्यांच्याकडून त्याने दोन लाख ५० हजार रुपये घेतले होते. आणखीही काही जागा भरायच्या असून लिपीकसाठी दोन लाख तर शिपाई पदासाठी दीड लाखांचा भाव असल्याचे सांगून त्याने जून २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत सहा जणांकडून दहा लाख ५० हजार असे तब्बल १३ लाख रुपये त्याने घेतले. यामध्ये नौपाडयातील मांडवकर यांच्यासह दोघे, सांताक्रूझ, रत्नागिरी, डोंबिवली आणि डोळखांब, शहापूर येथील प्रत्येकी एकाची फसवणूक झाली. पैसेही नाही आणि मुलीला नोकरीही न लावल्याने मांडवकर यांनी याप्रकरणी २५ जुलै रोजी तक्रार दाखल केल्यावर मोरेला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर हे अधिक तपास करीत आहेत.