- ठाणे, दि. 26 – अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे नाव इफेड्रीन प्रकरणात गोवण्याकरिता ठाणे पोलिसांनी आपल्याला टॉर्चर केले. आपल्या आई-वडीलांनाही सह आरोपी करण्याची धमकी दिल्याचा आरोप या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयमुखी याने ठाण्याच्या विशेष न्यायालयात केला. ममता कुलकर्णी हिचा या प्रकरणाशी दूरान्वये संबंध नसल्याचा दावाही त्याने केला.
ठाण्याचे विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात जयमुखीने आपल्या वकीलामार्फत दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, ठाणे पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणामध्ये ममता कुलकर्णीचे नाव घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारे जबरदस्ती केली. पोलीस कोठडीत आपल्याला मारहाण करुन गुप्तांगाला वीजेचा शॉकही दिला. आपण शाकाहारी असताना पोलिसांनी मांसाहार केलेली भांडी धुण्यास भाग पाडले. सतरंजी न देता जमिनीवर झोपण्यास भाग पाडले. तसेच आई-वडीलांना आणि बहिणीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके आणि उपनिरीक्षक अमोल वालझडे यांनी प्रचंड दबाव आणल्याचे त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, जयमुखीला अटक केल्यानंतर त्याने वाशी न्यायालयातच आपला जबाब नोंदविला होता. त्या जबाबामध्ये इफेड्रीनच्या तस्करीबाबतच्या केनियातील बैठकीसाठी ममता, मनोज जैन आणि विकी गोस्वामी हजर होते. सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे तिला ७० टक्के शेअर खरेदी करुन स्वत: मुख्य मालक व्हायचे होते. एव्हॉनचा ४५ रुपयांचा शेअर २६ रुपयांमध्ये खरेदी करुन तिने यासाठीची प्रक्रिया सुरु केली होती. अनेक ठिकाणी विकीच्या वतीने ती स्वत: इफेड्रीन तस्करीची डील करीत होती, अशा अनेक बाबी जयमुखीने नोंदविल्या होत्या. दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तळोजा (नवी मुंबई) मध्यवर्ती कारागृहातून अधीक्षकांमार्फत याच संदर्भात जबाब देण्याची विनंती केली होती. न्या. पटवर्धन यांनी ती मान्य करुन वेगळा काही जबाब द्यायचा आहे का? अशी विचारणा केली. तरीही त्याने वाशी न्यायालयात यापूर्वी दिलेला जबाबच कायम ठेवायचा असल्याचे सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
त्याने यापूर्वीचे दोन्ही जबाब हे न्यायालयातच दिलेले आहेत. दुसरा जबाब दिला त्यावेळी तो न्यायालयीन कोठडीतच होता. त्यामुळे त्याच्यावर दबाव आणण्याचा किंवा त्याला टॉर्चर करण्याचा प्रश्नच नसल्याचा दावा ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी केला. शिवाय, पोलीस कोठडीत असतांना त्याची दर २४ तासांनी वैद्यकीय तपासणीही केली जात होती. त्याला त्रास दिला असता किंवा वीजेचा शॉक दिला असता तर ते या तपासणीतही स्पष्ट झाले असते. इफेड्रीन तपासावरील पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी तसेच ममता आणि विकी गोस्वामीला फायदा मिळण्यासाठी जयमुखीची धडपड सुरु आहे. कदाचित त्याच्यावर कोणीतरी दबाव आणून उलटा जबाब देण्यासाठी भाग पाडले असावे. न्यायालयाने आदेश दिले तर याप्रकरणाचीही चौकशीही केली जाईल, असेही शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
* काय आहेत ममतावर आरोप
केनियामध्ये २ ते ७ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत मनोज जैन, विकी गोस्वामी आणि पुनित यांच्याबरोबर आरोपी क्रमांक १४ ममताचा सहभाग.
* एव्हॉन लाईफसायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे ५१ टक्के शेअर खरेदी करुन कंपनीची मालकीण होण्याकरिता केले प्रयत्न.
* मुख्य आरोपी विकी गोस्वामी याच्यासमवेत इफेड्रीन तस्करीमध्ये महत्त्वाचा सहभाग.
*ड्रग तस्करीचा पैसा स्वीकारण्यात विकीबरोबर सहभागी.