मुंबई : अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज, अखंड महाराष्ट्रासाठी उभे राहा असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार बोलले आहेत. वेगळ्या विदर्भावर रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच वेगळा विदर्भ हवा असेल तर जनमत घ्यावं लागेल, जनमताशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी करणं हा विदर्भावर अन्याय आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
वेगळ्या विदर्भावरुन एकीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असताना प्रफुल्ल पटेल यांनी मात्र वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शवलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भुमिका काय याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावरुन राष्ट्रवादीला टोमणा मारला होता. त्यामुळे शरद पवारांसोबत झालेल्या या बैठकीनंतर आता तरी भुमिका स्पष्ट झाली असावी.