सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई: आगामी सात वर्षात ५५ हजार घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या ‘सिडको’ने आता आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१० घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या गृहप्रकल्पासाठी सुमारे २ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
सदर गृहप्रकल्प उभारणीसाठी ‘सिडको’ने निविदा काढल्या असून साधारणत: दिवाळीपर्यंत गृहप्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिली. ‘सिडको’ने यापूर्वी विविध घटकांसाठी साधारण दीड लाख घरे बांधली आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत आणखी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार ‘सिडको’ने व्यक्त केला आहे. परंतु, भविष्यात सिडको गरीबांसाठीच (आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी) घरे उभारणार असल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.
यापूर्वी ‘सिडको’ने खारघर येथे स्वप्नपुर्ती, व्हॅलीशिल्प आणि उलवे येथे उन्नती या प्रकल्पाअंतर्गत ३,६०० घरे बांधली आहेत. आता ‘सिडको’ने तळोजा परिसरात १३,८१० घरांचा गृहप्रकल्प उभारण्याचा संकल्प सोडला आहे. सदर गृहप्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार असून पहिल्या टप्प्यात ७,१७९ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी १,३२० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर दुसर्या टप्प्यात ६,६३१ घरे बांधली जाणार असून त्यासाठी १,२२० कोटी रूपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. आगामी तीन वर्षात टप्प्याटप्प्याने उर्वरित ३८,३१७ घरे बांधून पूर्ण करण्याचे ‘सिडको’चे उद्दिष्ट असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली.
तळोजा येथे उभारण्यात येणार्या गृहप्रकल्पासाठी एकूण २ हजार ५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार अलिकडेच निविदा काढण्यात आली आहे. निविदेची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आगामी दोन-तीन महिन्यात गृहप्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती ‘सिडको’चे मुख्य अभियंता के. कृ. वरखेडकर यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी उभारण्यात येणार्या सदर गृहप्रकल्पातील घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ३०८ चौरस फूट आणि ३७० चौरस फूट असणार आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांना किफायतशीर ठरणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘सिडको’ने पावले उचलली आहेत. त्यानुसार २०१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ‘सिडको’ने बाळगले आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय ‘सिडको’ने घेतला आहे. त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. सदर घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदि ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित आहे.