* निविदा प्रक्रिया रखडल्याने विलंब
* जुन्या गणवेशातच करणार स्वातंत्र्य दिन साजरा
नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या २५ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, वह्या, रेनकोट व इतर साहित्य मिळालेले नाही. निविदा प्रक्रिया रखडल्याने ही दिरंगाई झाली आहे. वह्या व गणवेशासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, बूट, गणवेश व इतर साहित्य मोफत देत असते. प्रत्येक वर्षी पावसाळा संपत आल्यानंतर रेनकोट व दिवाळीच्या दरम्यान गणवेश दिला जायचा. याविषयी पालकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तीन वर्षांपासून मे महिन्यामध्येच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात होती. परंतु यावेळी शैक्षणिक साहित्याच्या टेंडरवरून आरोप – प्रत्यारोप झाल्याने ते रद्द करून पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. निविदेची प्रक्रिया करण्यासाठी विलंब झाल्याने शाळा सुरू होवून दीड महिना झाल्यानंतरही शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. विद्यार्थ्यांना वह्याही मिळाल्या नसल्याने दुकानांमधून खरेदी कराव्या लागल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू असून रेनकोट न दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळा सुटल्यावर पुन्हा घरी जाताना भिजावे लागत आहे. शैक्षणिक साहित्य कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
जुने गणवेश घालून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. पुस्तके ठेवण्यासाठी बॅगही नाही. स्वातंत्र्य दिन जवळ आला असून तोपर्यंततरी नवीन गणवेश मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थी विचारू लागले आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वह्या व गणवेश पुरविण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली आहे. यामुळे किमान दोन महिने ते मिळणार नाही. रेनकोट व इतर साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिला असून एक महिन्यात साहित्य विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबद्दल शिवसेना पदाधिकार्यांनी पालिका आयुक्तांना पत्र देवून लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.*****
महापालिका शाळेत गोरगरीब घरातील मुले शिक्षण घेत आहे. खासगी शाळांच्या धर्तीवर पालिका शाळेतील मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरता मोठा गाजावाजा करत पालिका शाळेच्या गणवेशाचे स्वरूप बदलण्यात आले. शाळा सुरू होवून चार महिने उलटल्यावर गणवेश मिळणार असेल तर मुलांमध्ये कोणता आत्मविश्वास निर्माण होणार? आत्मविश्वास नाही, पण न्यूनगंड मात्र नक्कीच निर्माण होईल. पालिका प्रशासनाने युध्दपातळीवर गणवेश उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न करावेत.
रवींद्र सावंत
इंटक : नवी मुंबई अध्यक्ष